रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवणार - किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 10:19 IST2017-08-14T23:33:18+5:302017-08-15T10:19:54+5:30
भारतात राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे.

रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवणार - किरेन रिजिजू
नवी दिल्ली, दि. १४ - भारतात राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यामध्ये संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारांनी आपापल्या प्रदेशात अवैधरित्या राहत असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटवून त्यांना परत माघारी पाठवावे.
भारतात सध्या ४० हजार रोहिंग्या मुस्लिम अवैधरित्या राहत आहेत. त्यातील काही जणांनी यूएन रजिस्ट्रेशन एजन्सीमध्ये नोंदणी केली आहे. पण सरकारकडून या सर्वांना माघारी धाडण्याची तयारी सुरू आहे. रोहिंग्या मुस्लिमांना बौद्धबहूल म्यानमारमध्ये हिंसक घटनांची शिकार व्हावे लागत आहे. त्यामुळे हा समूह भारतासह अन्य देशात परागंदा झाला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या हाय कमिशन फॉर रिफ्यूजीजने भारतात राहत असलेल्या १६ हजार ५०० रोहिंग्या मुस्लिांमाना ओळखपत्रे दिली आहे. रोहिंग्या मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचा त्रास, तुरुंगवास आणि प्रत्यार्पणापासून वाचवण्यासाठी हाय कमिशन फॉर रिफ्यूजीकडून ही ओळखपत्रे देण्यात येतात.
दरम्यान, मोदी सरकारमधील मंत्री किरेन रिजिजू यांनी अशाप्रकारची नोंदणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. रिजिजू म्हणाले, ते अशाप्रकारचे काम करत आहे. असे काम करण्यापासून आम्ही त्यांना अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या रिफ्युजींसंदर्भातील निर्णय आमच्यासाठी बंधनकारक नाही.