Delhi Crime: राजधानी दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने देशभरातील खासदारांनी तिथे उपस्थिती लावली आहे. त्यामुळे दिल्लीत कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीतही खासदारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा समोर आला आहे. दिल्लीत लोकसभेतील काँग्रसेच्या महिला खासदाराची चैन हिसकावून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला खासदाराने थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील तामिळनाडू भवनाजवळ लोकसभा खासदार आर. सुधा यांची साखळी हिसकावण्यात आली. तामिळनाडूतील मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातील खासदार आर. सुधा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. सोमवारी सकाळी चाणक्यपुरी परिसरातील पोलंड दूतावासाजवळ झालेल्या या घटनेत त्यांची सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली. या दुर्घटनेत त्यांना दुखापत झाली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना गुन्हेगाराचा शोध घेण्याचे आणि अटक करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.
"एलआर. सुधा, मी तामिळनाडूमधील मयिलादुथुराई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली खासदार आहे. मी नियमितपणे नवी दिल्लीत संसदीय कामकाज आणि संसदीय समितीच्या बैठकींना नियमितपणे उपस्थित राहते. माझ्यासारख्या काही खासदारांसाठी नवी दिल्लीत अधिकृत निवास व्यवस्था अद्याप तयार झालेली नसल्याने, मी गेल्या एक वर्षापासून तामिळनाडू हाऊस (खोली क्रमांक ३०१) येथे राहत आहे. वेळ मिळेल तेव्हा सकाळी फिरायला जाण्याची माझी सवय आहे. ४ ऑगस्ट २०२५ (सोमवार) रोजी, मी आणि राज्यसभेतील आणखी एक महिला खासदार सुश्री राजथी तामिळनाडूहून फिरायला बाहेर पडलो. सकाळी ६.१५ ते ६.२० च्या सुमारास, आम्ही पोलंड दूतावासाच्या गेट-३ आणि गारे-४ जवळ असताना हेमेट घातलेला आणि चेहरा पूर्णपणे झाकलेला एक माणूस विरुद्ध दिशेने आमच्याकडे आला आणि माझी सोन्याची साखळी हिसकावून पळून गेला," असं आर. सुधा यांनी म्हटलं.
"तो विरुद्ध दिशेने हळू हळू येत असल्याने मला तो साखळी चोर असावा असा संशय आला नाही. त्याने माझ्या मानेतून साखळी काढताच माझ्या मानेला दुखापत झाली आहे आणि माझा चुडीदारही फाटला आहे. आम्ही दोघीही मदतीसाठी ओरडलो. काही वेळाने, आम्हाला दिल्ली पोलिसांचे एक पेट्रोलिंग वाहन दिसले आणि आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आम्हाला लेखी तक्रार देण्याचा आणि त्यासाठी अधिकारक्षेत्रातील पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. चाणक्यपुरीसारख्या हाय सिक्युरिटी क्षेत्रात, जिथे दूतावास आणि संरक्षित संस्था आहेत, तिथे एका संसदेच्या महिला सदस्यावर झालेला हा निर्घृण हल्ला अत्यंत धक्कादायक आहे. जर भारताच्या राष्ट्रीय राजधानीत एखादी महिला सुरक्षितपणे चालू शकत नसेल, तर आपला जीव आणि मौल्यवान वस्तूंची भीती न बाळगता कुठे सुरक्षित वाटू शकते. माझ्या मानेला दुखापत झाली आहे, माझी ४ पेक्षा जास्त वजनाची सोन्याची साखळी चोरीला गेली आहे आणि या हल्ल्यामुळे मला खूप मानसिक आघात झाला आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना या हाय सिक्युरिटी क्षेत्रात असंख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी आणि अटक करण्यासाठी निर्देश द्यावेत. कृपया माझी सोन्याची साखळी परत मिळवून द्यावी आणि मला लवकरात लवकर न्याय मिळावा," असेही आर. सुधा म्हणाल्या.