नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:09 IST2025-09-08T13:09:18+5:302025-09-08T13:09:43+5:30
ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ते दूरस्थ बीएड करत होते. शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा होती, यामुळे त्यांनी वाटेत हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला होता.

नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
राजस्थानच्या ४ विद्यार्थ्यांनी रस्ते बंद असल्याने परीक्षेला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला आहे. यासाठी ते राजस्थानहून उत्तराखंडलापरीक्षा देण्यासाठी जात होते. ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ते दूरस्थ बीएड करत होते. शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा होती, यामुळे त्यांनी वाटेत हेलिकॉप्टरचा पर्याय निवडला होता.
उत्तराखंडच्या मुक्त विश्वविद्यालयात ओमाराम जाट, मंगाराम जाट, प्रकाश जाट आणि नरपत कुमार हे चार विद्यार्थी बीएडचे शिक्षण घेत होते. त्यांना उत्तराखंडला आरएस तोलिया पीजी कॉलेजमध्ये परीक्षेला जायचे होते. परंतू, भूस्खलन, पाऊस यामुळे उत्तराखंडचे बरेचसे रस्ते बंद झालेले आहेत. ३१ ऑगस्टला ते कसेबसे उत्तराखंडच्या हल्द्वानीला पोहोचले होते. परंतू त्यांना मुनस्यारीला जाणारे सर्व रस्ते बंद असल्याचे समजले. आता परीक्षा चुकणार असेल वाटले. थोडी विचारपूस केल्यावर त्यांना हेलिकॉप्टर सेवेची माहती मिळाली.
हल्द्वानीहून मुनस्यारीला एक एव्हिएशन कंपनी हेलिकॉप्टर सेवा पुरवत होती. परंतू वातावरण खराब असल्याने त्यांनी सेवा बंद केली होती. या विद्यार्थ्यांनी या कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आणि अडचण सांगितली. तसेच परीक्षेला नाही गेले तर एक वर्ष वाया जाणार होते, हे देखील सांगितले. त्यांची अडचण ओळखून कंपनीच्या मालकाने दोन पायलट सोबत देत हेलिकॉप्टरची सोय केली. या हेलिकॉप्टरने हे विद्यार्थी परीक्षेला गेले आणि परत आले. एका विद्यार्थ्यासाठी एका बाजुचे भाडे हे ५२०० रुपये ठरविण्यात आले होते.