Road Safety : मुलांना दुचाकीवर बसवण्याबाबतच्या नियमात मोठा बदल, नियमभंग झाल्यास होणार जबर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:21 IST2022-02-16T16:20:50+5:302022-02-16T16:21:47+5:30
Road Safety : जर तुम्ही तुमच्या मुलांना दुचाकीवर पुढे किंवा मागे बसवून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुलांच्या सुरक्षेसाठी नियमामध्ये बदल केला आहे.

Road Safety : मुलांना दुचाकीवर बसवण्याबाबतच्या नियमात मोठा बदल, नियमभंग झाल्यास होणार जबर दंडात्मक कारवाई
नवी दिल्ली - जर तुम्ही तुमच्या मुलांना दुचाकीवर पुढे किंवा मागे बसवून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मुलांच्या सुरक्षेसाठी नियमामध्ये बदल केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने मुलांना दुचाकीवर बसवण्याबाबतच्या नियमाला आधीपेक्षा अधिक सुरक्षित केले आहे. तसेच या नियमाचा भंग केल्यास भरभक्कम दंडात्मक कारवाई होऊ शकते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. हा नियम पुढील वर्षी १५ फेब्रुवारी २०२३पासून लागू होणार आहे. सध्या या नियमामध्ये दंडात्मक रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच अधिसूचनेमध्ये दंडाची रक्कम राज्य सरकारे निश्चित करतील, असे म्हटले आहे.
नव्या प्रस्तावानुसार ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेताना बाईक, स्कूटर आणि स्कूटीसारख्या दुचाकी वाहनाची वेगमर्यादा ही ४० किमी प्रतितास पेक्षा अधिक असता कामा नये.
- दुचाकीचालकाच्या मागे बसणाऱ्या ९ महिन्यांपासून ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हॅल्मेट घालणे आवश्यक आहे
- दुचाकीचालक ४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आपल्यासोबत दुचाकीवर बांधून ठेवण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करेल.
- सेफ्टी हार्नेस ही मुलांना घालण्यात येणारी एक जॅकेट असते. तिची साईझ अॅडजेस्ट करता येते. ती मुलांना दुचाकी चालकाशी बांधून ठेवते. सुरक्षा जॅकेटशी संबंधित फित मुलांना दुचाकी चालकाच्या खांद्याशी जोडून ठेवण्याचे काम करतात. मंत्रालयाने या प्रस्तावाबाबत सल्ले आणि आक्षेप मागवले आहेत.
कारमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी चाइल्ड लॉकसह अनेक फिचर्स दिले जातात. या फिचर्सच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेबाबतच्या बाबींची पूर्तता केली जाते.