Bihar: "माझ्या वाहनावर दगड आणि शेण फेकले", जमावाने केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:54 IST2025-11-06T14:51:58+5:302025-11-06T14:54:28+5:30
RJD Supporters Attack on CM Vijay Kumar Sinha Car: बिहारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केल्याची बातमी समोर आली.

Bihar: "माझ्या वाहनावर दगड आणि शेण फेकले", जमावाने केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
बिहारच्या लखीसराय येथून मोठी बातमी समोर आली. आरजेडीच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री आणि लखीसराय येथील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या वाहनाला घेरून मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तसेच त्यांच्या ताफ्याला पुढे जाण्यापासून रोखले. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस आणि सुरक्षा दलाने गर्दीला मागे ढकलले, ज्याचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून शेअर केला आहे.
विजय सिन्हा यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "हे आरजेडीचे गुंड आहेत. माझ्या वाहनावर दगड आणि शेण फेकण्यात आले. त्यांनी मला गावात प्रवेश करू दिला नाही. आम्हाला असे वृत्त मिळाले आहे की, आरजेडी कार्यकर्त्यांनी हलसी ब्लॉकमधील एका बूथवर एका पोलिंग एजंटला धमकावले. आरजेडी सदस्यांमध्ये अजूनही बूथ ताब्यात घेण्याची मानसिकता आहे. परंतु, मालक जनता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एनडीए निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची योजना आखत आहे.
#WATCH | #BiharElection2025 | RJD supporters surround Deputy CM and BJP candidate from Lakhisarai constituency, Vijay Kumar Sinha's car, hurl slippers and chant "Murdabad", forbidding him from going ahead. Police personnel present here.
— ANI (@ANI) November 6, 2025
Visuals from Lakhisarai. pic.twitter.com/qthw0QWL7G
याच पार्श्वभूमीवर मांझी मतदारसंघातील सीपीएम आमदार आणि महाआघाडीचे उमेदवार सत्येंद्र यादव यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, जैतपूर गावात ग्रामस्थांनी सत्येंद्र यादव यांच्या वाहनावर हल्ला केला. आमदार जैतपूर गावात मतदानात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या घटनेदरम्यान काही हल्लेखोरांनी आमदार सत्येंद्र यादव यांच्या वाहनावर दगडफेक केली, ज्यामुळे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच, मोठ्या संख्येने महाआघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.