मोदींच्या काळात दंगली वाढल्या!
By Admin | Updated: August 13, 2014 03:34 IST2014-08-13T03:34:07+5:302014-08-13T03:34:07+5:30
उत्तर प्रदेशातील ताज्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले

मोदींच्या काळात दंगली वाढल्या!
तिरुवनंतपुरम् : उत्तर प्रदेशातील ताज्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून देशात जातीय दंगलींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये हेतुपुरस्सरपणे फूट पाडली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. जातीय तेढ निर्माण करण्यास भाजपाकडून जाणीवपूर्वक दंगली घडविल्या जात आहेत. संपुआ सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात क्वचितच जातीय हिंसाचाराची घटना घडली असावी. पण नवे सरकार स्थापन झाल्यापासून गत ११ आठवड्यांत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या अन्य भागांतील जातीय संघर्षांच्या ६०० वर घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटना निवडणुका वा पोटनिवडणुका होऊ घातलेल्या भागांत घडल्याने त्या सुनियोजित असल्याचा संशय बळावतो आहे. हा गंभीर चिंतेचा विषय आहे, असे त्या म्हणाल्या.
धर्मनिरपेक्षतेची चौकट नेस्तनाबूत करण्यासाठी काही जातीय शक्ती एकवटल्या आहेत. पण काँग्रेस धर्मांध शक्तींना कधीही वरचढ होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक पारित न झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. आपला पक्ष आता विरोधकांत असला तरी या विधेयकासाठी प्रयत्न सुरूच ठेवील, असेही त्या म्हणाल्या.