"तुम्ही यापुढे काही करु नका"; कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जींवर संतापले पीडितेचे वडील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:11 IST2025-01-21T16:05:56+5:302025-01-21T16:11:42+5:30
आरजी कार प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.

"तुम्ही यापुढे काही करु नका"; कोर्टाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जींवर संतापले पीडितेचे वडील
RG Kar Case: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि हत्या प्रकरण हायकोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा दिल्याने सियालदह कोर्टाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपी संजय रॉयला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पश्चिम बंगाल सरकारने हायकोर्टाकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता पीडितेच्या वडिलांना ममता बॅनर्जी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. तुम्ही काहीच करु नका अशा शब्दात पीडितेच्या वडिलांनी ममतांना सुनावलं आहे.
देशाला हादरवून सोडणाऱ्या आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामुळे पीडित डॉक्टरचे कुटुंब संतप्त झाले आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तुम्ही काहीही करू नका असं आवाहन केले आहे. या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी एका ३२ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा झाल्याने हे प्रकरण तापलं.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सर्वत्र होत होती. मात्र कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. दुसरीकडे, आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारतर्फे वकील किशोर दत्ता यांनी खंडपीठाचे न्यायाधीश देबांगशु बसाक यांच्याकडे धाव घेतली आहे. यासाठी याचिका नोंदवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितले. या प्रकरणाची गणना दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्ये व्हायला हवी होती ज्यात दोषीला कठोर शिक्षा व्हायला हवी होती, असं ममता म्हणाल्या.
पीडितेच्या वडिलांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही आदेशाची प्रत मिळवू त्यानंतर काय करायचे ते ठरवू. त्यांना (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) घाईने काहीही करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत जे काही केले, त्यांनी पुढे काही करू नये. सीबीआय योग्य पुरावे देऊ न शकल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्या खूप काही करु शकल्या असत्या पण त्यांनी केवळ पुराव्यांशी छेडछाड केली आहे. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी व इतरांनी पुराव्यांसोबत छेडछाड केली. त्यांना हे सर्व पहिल्यापासून दिसत नव्हते का?," असा सवाल पीडितेच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना केला.
दरम्यान, दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर आपण समाधानी नसल्याचे मृताच्या कुटुंबीयांनी म्हटलं. या प्रकरणाचा तपास अर्धवट राहिल्याने या गुन्ह्यात सहभागी असलेले अनेक गुन्हेगार वाचले, असा दावा त्यांनी केला. न्यायासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.