त्या कर्मचा-यांचे निलंबन मागे घ्या - स्मृती इराणी
By Admin | Updated: May 31, 2014 18:13 IST2014-05-31T13:48:11+5:302014-05-31T18:13:16+5:30
आपल्या शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिर करणा-या कर्मचा-यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.

त्या कर्मचा-यांचे निलंबन मागे घ्या - स्मृती इराणी
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३१ - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहीर करणा-या दिल्ली विद्यापीठातील पाच कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी इराणी यांनी केली आहे. शिक्षण विभागातील त्या कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी इराणी यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेश सिंह यांच्याकडे केली आहे.
' माझ्या शैक्षणिक पात्रतेची माहिती उघड करणा-या कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी विनंती आपण दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली असल्याचे ' असे ट्विट स्मृती इराणी यांनी केले आहे. ' सार्वजनिक जीवनात सर्वांनी चौकशी तसेच टीका-टिप्पणीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, मी त्यासाठी तयार आहे ' असेही इराणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी स्मृती इराणींचे त्यांच्या या कृतीबद्दल आभार मानले आहेत. तसेच आपले किती शिक्षण झाले आहे, ते देशाला सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.