जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला ५ महिन्यांनंतर सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळालं आहे. सुरक्षा दलांच्या या कारवाईमुळे या हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली असून, दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल मानलं जात आहे.
नेमका कोण आहे हा आरोपी?
सुरक्षा दलांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद युसूफ कटारी असून, तो कुलगामचा रहिवासी आहे. युसूफवर असा आरोप आहे की, त्याने पहलगाममधील बैरसन खोऱ्यात २६ निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली होती. यात लॉजिस्टिकल सपोर्टचा समावेश आहे. त्याला अटक केल्यानंतर पुढील १४ दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना याआधीच कंठस्नान घालण्यात आलं आहे.
ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई
२२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' सुरू केलं होतं. या ऑपरेशन अंतर्गत युसूफची अटक हे सुरक्षा दलाचं मोठं यश मानलं जात आहे. दहशतवादी नेटवर्कचा भाग असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या या आरोपीच्या अटकेमुळे अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
युसूफ हा स्थानिक रहिवासी असल्याने त्याला परिसराची चांगली माहिती होती. त्याने दहशतवाद्यांना योग्य मार्ग दाखवणे, त्यांना लपण्याची ठिकाणे उपलब्ध करून देणे आणि शस्त्रे पुरवणे यांसारखी मदत केल्याचा आरोप आहे. याच मदतीच्या आधारे दहशतवाद्यांनी बैरसन खोऱ्यात ही अमानुष घटना घडवून आणली. युसूफच्या चौकशीतून तो इतर कोणत्या दहशतवादी संघटनांना मदत करत होता, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त
युसूफच्या अटकेनंतर सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातील ब्रिनाल जंगल परिसरात दहशतवाद्यांचा तळ शोधून काढला आणि तो स्फोटकांचा वापर करून उद्ध्वस्त केला. या तळाचा वापर दहशतवाद्यांना आवश्यक रसद, दारूगोळा, शस्त्रे, लपण्याची ठिकाणे, मोबाईल फोन आणि पैशांच्या मदतीसाठी केला जात होता. या ठिकाणाहून एक गॅस सिलेंडर आणि इतर आवश्यक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. या भागात अजूनही व्यापक शोध मोहीम सुरू असून, इतर कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षा दले सज्ज झाली आहेत.