राजीनाम्यांनी सेन्सॉर बोर्ड हादरले
By Admin | Updated: January 17, 2015 06:50 IST2015-01-17T03:25:03+5:302015-01-17T06:50:03+5:30
सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ सदस्य इरा भास्कर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे

राजीनाम्यांनी सेन्सॉर बोर्ड हादरले
नवी दिल्ली : सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ सदस्य इरा भास्कर यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या वादग्रस्त चित्रपटाला चित्रपट प्रमाणीकरण अॅपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मंडळाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या. सेन्सॉर बोर्डात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नियुक्त केलेले सदस्य आणि अधिकारी संगनमत करीत भ्रष्टाचारात गुंतले असून ते कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मंडळाच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. संपुआ सरकारच्या काळात स्थापन झालेल्या सेन्सॉर बोर्डाचे उर्वरित सदस्य एम.के. रैना, पंकज शर्मा, राजीव मसंद, अंजुम राजा बली, शुभ्रा गुप्ता आणि शाजी हे येत्या दोन दिवसांत राजीनामे देतील असे तर्कवितर्क सुरू आहेत. ‘मॅसेंजर आॅफ गॉड’ या चित्रपटाचा शुक्रवारी गुरगाव येथे होणारा प्रिमियर शो रोखण्यात आला आहे.
सॅमसन यांची तीन वर्षांची कारकीर्द एप्रिल २०१४ मध्ये संपली होती मात्र मोदी सरकारने नवी नियुक्ती न केल्याने त्या पदावर कायम होत्या. सदस्यांचीही अशीच अवस्था होती. जुलैमध्ये मंडळाने पुढील नोटिशीपर्यंत मुदतवाढ दिल्याचे नमूद केले होते.
इरा भास्कर यांचीही नाराजी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य इरा भास्कर यांनीही राजीनामा देत या संवैधानिक मंडळाच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)