यूपी सरकारचा गृहमंत्रालयाला अहवाल
By Admin | Updated: May 31, 2014 06:15 IST2014-05-31T06:15:38+5:302014-05-31T06:15:38+5:30
दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे

यूपी सरकारचा गृहमंत्रालयाला अहवाल
बदायू (उ़प्ऱ): दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे. काही आरोपींना अटक करण्यात आली असून दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात बुधवारी दोन किशोरवयीन दलित बहिणींवर बलात्कार आणि खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह झाडावर लटकावण्यात आले होते. या अमानुष घटनेची माहिती अधिकार्यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना शुक्रवारी दिली. उत्तर प्रदेश सरकारने गृह मंत्रालयाला या घटनेचा अहवाल पाठवला आहे, अशी माहिती राजनाथसिंह यांना देण्यात आली. राज्य सरकारनेदेखील गृहमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. गृह मंत्रालयाचे अधिकारी राज्यातील अधिकार्यांच्या संपर्कात असून, सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे जनक्षोभ उसळ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने दोन कॉन्स्टेबलला बडतर्फ केले आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींपैकी आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर आणखी एक पोलीस, अटकेतील आरोपी कॉन्स्टेबलचा भाऊ आणि दोन अज्ञात आरोपी फरार आहेत. (वृत्तसंस्था)