ग्रेटर नोएडा: व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढल्यानं संतापलेल्या तरुणानं ग्रुप अॅडमिनवर बंदूक रोखल्याची घटना ग्रेटर नोएडातील ग्रेनो वेस्टमध्ये घडली आहे. यानंतर अॅडमिनची बाजू घेणाऱ्या काहीजणांनी बंदूक रोखणाऱ्या तरुणाची धुलाई केली. यानंतर गावातील ज्येष्ठांच्या मध्यस्तीनं हा वाद मिटला. बिसरत पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रेनो वेस्टमधील मिल्क लच्छी गावातील एका तरुणानं निवडणुकीसाठी पदवीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये चुकून एक विद्यार्थी अॅड झाला होता. हा विद्यार्थी अभ्यासात फारसा रस घेत नसल्यानं अॅडमिननं त्याला ग्रुपमधून काढलं. त्यामुळे संतापलेल्या तरुणानं अॅडमिनला फोन करुन शिवीगाळ केली. यानंतर ग्रुपमधून काढण्यात आलेल्या तरुणानं अॅडमिनवर बंदूक रोखली. याची माहिती अॅडमिनच्या मित्रांना मिळताच त्यांनी बंदूक रोखणाऱ्या तरुणाला मारहाण केली. या वादाची माहिती मिळताच गावातील ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्ती केली. त्यामुळे हा वाद मिटला. ग्रुपमधून काढण्यात आलेल्या तरुणानं मारहाण करणाऱ्या गटाविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढण्यात आल्यानं मिल्क लच्छी गावात वाद झाल्याची माहिती एसएचओ अनिल कुमार यांनी दिली आहे.
व्हॉट्स अॅप ग्रुपमधून काढल्यानं तरुणाची 'सटकली'; अॅडमिनवर बंदूक रोखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 13:10 IST