पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात पाटणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याचा आदेश दिला आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पी.बी. बजंत्री यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने सुनावणीदरम्यान हा आदेश दिला.
काय आहे प्रकरण?
बिहारकाँग्रेसने अलीकडेच पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या व्हिडिओवरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
व्हिडिओमध्ये काय होते?
बिहार काँग्रेसने तयार केलेल्या एआय-जनरेटेड व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी झोपलेले दिसतात, तेव्हा त्यांची आई हिराबेन स्वप्नात येऊन मोदींना त्यांना फटकारतात. व्हिडिओमध्ये हिराबेन म्हणतात, "अरे बेटा, आधी तू मला नोटाबंदीसाठी लांब रांगेत उभे केलेस. आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने राजकारण करत आहेस. तू माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर्स छापत आहेस. राजकारणाच्या नावाखाली तू किती खालच्या पातळीवर जाणार आहेस?" असे या व्हिडिओत होते.
व्हिडिओविरुद्ध एफआयआर दाखल
दिल्ली भाजप नेते संकेत गुप्ता यांनी या एआय व्हिडिओबाबत तक्रार दाखल केली आणि काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आयटी सेलला मुख्य दोषी ठरवले. एफआयआरमध्ये म्हटले की, काँग्रेसने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदींची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला कलंकित केले. असा व्हिडिओ मातृत्वाची थट्टा आहे. तसेच, भाजपने काँग्रेसवर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईची बदनामी केल्याचा आरोप केला.