कोरोना काळात विक्रमी परदेशी गुंतवणूक - पंतप्रधान; आता जग विचारते की, भारत का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:55 IST2020-12-20T05:23:11+5:302020-12-20T06:55:45+5:30
Prime Minister Narendra Modi : जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.

कोरोना काळात विक्रमी परदेशी गुंतवणूक - पंतप्रधान; आता जग विचारते की, भारत का नाही?
नवी दिल्ली : जगाचा भारतावर विश्वास आहे. त्यामुळेच कोरोना साथीच्या काळातही भारतात विक्रमी विदेशी गुंतवणूक झाली, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. असोचेमच्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमात बीजभाषण करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी यांनी असेही म्हटले की, आता देश बदलला आहे. पूर्वी जग विचारत असे की, भारत कशासाठी? आता जग विचारते की, भारत का नाही?
मोदी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना काळात जगभरातील देशांचे गुंतवणुकीचे स्रोत आटलेले असताना भारतात मात्र विक्रमी थेट परकीय गुंतवणूक झाली. हा विश्वास कायम राखण्यासाठी आपण देशांतर्गत गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे.
जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे चालले आहे. येणाऱ्या वर्षांत आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट आपण योग्य वेळेत गाठायला हवे, असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
पंतप्रधानांचे प्रयत्न दिखाऊ नव्हते - टाटा
रतन टाटा मोदी यांची प्रशंसा करताना म्हणाले, मोदी यांनी साथीच्या काळात अत्यंत कणखरपणे देशाचे नेतृत्व केले. तुम्ही डगमगला नाहीत, तुम्ही आघाडीवर राहून देशाचे नेतृत्व केले. देशाने काही मिनिटांसाठी दिवे बंद करावे, असे आवाहन तुम्ही केले आणि ते खरोखर तसे घडून आले. हे प्रयत्न वरवरचे अथवा दिखाऊ नव्हते.