विजय मल्ल्याच्या हकालपट्टीची शिफारस
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
बँकांचे काही हजार कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेला विजय मल्ल्या याची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस राज्यसभेच्या नीतिमूल्य समितीने केली आहे.

विजय मल्ल्याच्या हकालपट्टीची शिफारस
नवी दिल्ली : बँकांचे काही हजार कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेला विजय मल्ल्या याची राज्यसभेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी शिफारस राज्यसभेच्या नीतिमूल्य समितीने केली आहे. आचार समितीचे प्रमुख डॉ. कर्णसिंग यांनी विजय मल्ल्याला एका आठवड्यात त्याची भूमिका मांडावी, असे कळवले आहे. अर्थात ही केवळ औपचारिकता असून, मल्ल्याची राज्यसभेतून हकालपट्टी केली जाणार, हे जवळपास निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विरोधी पक्ष सदस्यांनी राज्यसभेच्या गेल्या अधिवेशनात मल्ल्याच्या हकालपट्टीसाठी नोटीस दिली होती. राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. हमीद अन्सारी यांनी हे प्रकरण नीतिमूल् समितीकडे सोपवले होते. समितीने त्या प्रकरणाचा विचार करून वरील शिफारस केली आहे. मल्य्याची मुदत यावर्षीच्या जुलैमध्ये संपणार आहे.
दरम्यान, विजय मल्ल्या याची आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्ता उघड करण्यात यावी, अशी विनंती संबंधित बँकांतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसे केल्यास त्याच्याकडील थकबाकी वसूल करणे सोपे होईल, असे या बँकांचे म्हणणे आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)