पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावाखाली लुटालूट, २४ हजार मृतांनाही मिळतं धान्य, बोगस रेशन कार्डचाही सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 16:15 IST2023-05-21T16:14:41+5:302023-05-21T16:15:07+5:30
Ration Scheme In Punjab: पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावावर लुटालूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यामध्ये तब्बल २४ हजारांहून अधिक मृत व्यक्तींच्या नावाने रेशन जारी होत असल्याची बाब समोर आली आहे.

पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावाखाली लुटालूट, २४ हजार मृतांनाही मिळतं धान्य, बोगस रेशन कार्डचाही सुळसुळाट
पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावावर लुटालूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यामध्ये तब्बल २४ हजारांहून अधिक मृत व्यक्तींच्या नावाने रेशन जारी होत असल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय काही प्रतिष्ठित लोकांनीही मोफत रेशन मिळवण्यासाठी अफरातफर करून बनावट रेशन कार्ड बनवल्याचे उघडकीस आले. आता तपासानंतर हे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. ही बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या लोकांची शहरांमध्ये घरं होती. तसेच त्यांचं वार्षिक उत्पन्नही निर्धारित उत्पन्नापेक्षा अधिक होतं. सरकारने सर्व जिल्हा अन्न आणि पुरवठा नियंत्रणांना तपासाचे आदेश दिले होते. त्यातूनच या अफरातफरीचा उलगडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विभाहाने आतापर्यंत ४० लाख ६८ हजार ८८७ रेशन कार्डची तपासणी केली आहे. त्यातील ३ लाख ३७ हजार ५६७ रेशनकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे. तर १ लाख ७९ हजार ८३७ रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जे मोफत रेशनकार्डसाठी पात्र नव्हते त्यांनीही रेशनकार्ड मिळवण्यासाठी जुगाड लावून स्वत:ला या योजनेसाठी पात्र करून घेतले. दरम्यान, तपासानंतर आता विभागाने २४ हजार मृतांची नावंही यादीमधून हटवली आहेत.
विभागीय माहितीनुसार रेशन कार्डचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच सरकारने सुमारे ९६ टक्के रेशनकार्डची तपासणी केली आहे. उर्वरित सुमारे ४ टक्के रेशन कार्ड तपासली जात आहेत. तपासामध्ये काही लोकांची शहरामध्ये २०० पासून एक हजार चौरस फुटांपर्यंत घरं बांधलेली आहेत, ते मोफत रेशन घेत होते. अशा लोकांची नावं आता यादीतून हटवण्यात आली आहेत.