बंगळुरू : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर जनता दलाचा (सेक्युलर) नेता, माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात कैदी क्रमांक १५५२८ देण्यात आला, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) प्रमुख एच.डी. देवेगौडा यांचा नातू रेवण्णाला शिक्षा सुनावल्यानंतर तो तुरुंगात पहिल्या रात्री रडत होता आणि अत्यंत अस्वस्थ दिसत होता.
वैद्यकीय तपासणीदरम्यान तो रडू लागला आणि कर्मचाऱ्यांसमोर आपल्या वेदना व्यक्त केल्या. रेवण्णाने सांगितले की, या शिक्षेविरुद्ध तो उच्च न्यायालयात अपील करणार आहे.
इतर कैद्यांसारखेच कपडेतुरुंग प्रशासनानुसार, कैद्यांसाठी ठरवलेल्या पोशाख नियमांचे पालन करण्यात येत असून, रेवण्णालाही कैद्यांसाठीचे अधिकृत कपडे घालावे लागतील. शनिवारी प्रज्वलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून, ११.५० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. रेवण्णा कुटुंबातील घरगुती मदतनिसाला ११.२५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकरण काय?न्यायालयाने लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या चार प्रकरणांपैकी एका प्रकरणात प्रज्वल रेवण्णा (३४) याला दोषी ठरवले आहे. हा खटला हसन जिल्ह्यातील रेवण्णा कुटुंबाच्या गन्नीकडा फार्महाऊसमध्ये मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेशी संबंधित आहे. २०२१ मध्ये तिच्यावर दोनदा बलात्कार झाला होता आणि आरोपीने त्याच्या मोबाइल फोनवर हे कृत्य रेकॉर्ड केले होते.