रमजानमध्ये बलात्कार चालतो, पण चपाती नाही

By Admin | Updated: July 24, 2014 13:40 IST2014-07-24T09:00:30+5:302014-07-24T13:40:02+5:30

रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमानाचा उपास तोडलेला चालत नाही, पण एखाद्या मुलीवर केलेला बलात्कार चालतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Rape goes on in Ramzan, but there is no chapati | रमजानमध्ये बलात्कार चालतो, पण चपाती नाही

रमजानमध्ये बलात्कार चालतो, पण चपाती नाही

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - रमजानच्या महिन्यात मुसलमानाचा उपास तोडल्याबद्दल गोंधळ माजवणा-यांना या पवित्र काळातच चिमुरड्या मुलीवर झालेला बलात्कार दिसत नाही का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचा-याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबून शिवसेनेच्या खासदारांनी त्याला रोजा तोडण्यास भाग पाडल्याच्या वृत्तावरून देशभरात गदारोळ माजल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून सेना खासदारांचे समर्थनच केले आहे. 'महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवणे हा जर अपराध असेल तर हो, हा अपराध आमच्या मर्दांनी केला आहे', असेही त्यांनी लेखात म्हटले आहे. तसेच शिवसेना खासदारांची ही अरेरावी नसून ते एक आंदोलन आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सदनाच्या निर्मितीत कोट्यावधी रुपये खर्च करूनही तेथे मराठी माणसाला हक्काने पाय ठेवता येत नाही, त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे संतापाचा भडका उडणे साहजिकच असल्याचे सांगत त्यांनी सेना खासदारांची पाठराखण केली आहे. 
शिवसेना सर्व धर्मांचा सन्मान करते. जोपर्यंत धर्माची फालतू मिजास कोणी दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच घेणेदेणे नाही. श्रद्धांचा विषय व्यक्तिगत आहे, पण त्याचा असा राजकीय बाजार करून शिवसेनेस बदनाम करण्याचा प्रयत्न होणार असेल तर मात्र गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
- अतिरेकी खर्च होऊनही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र’ व मराठीपण कोठेच दिसत नाही. तेथे मराठी माणसाला हक्काने पाय ठेवता येत नाही. महाराष्ट्रातून नव्याने निवडून गेलेल्या खासदारांचा मुक्काम सध्या नव्या महाराष्ट्र सदनात आहे व गेल्या महिनाभरापासून त्यांची अवस्था ‘गोठा’ बरा, पण या ‘सदनी’ राहणे नको अशीच झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, स्वच्छता नाही, कॅण्टीनची धड व्यवस्था नाही. हा सर्व मनस्ताप रोकडा पैसा मोजून विकत घ्यावा लागत असेल तर संतापाचा भडका उडणारच.
 
- या भडक्यास राजकीय व धार्मिक रंग देऊन वणवा पेटविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मंत्रालयातून होत आहे. महाराष्ट्र सदनात जो गैरव्यवहार, गैरप्रकार चालला आहे तो तसाच ठेवायचा काय? मराठी माणसाला दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे कारस्थान तसेच चालू द्यायचे काय, हा खरा प्रश्‍न आहे. या बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवणे हा जर अपराध असेल तर होय, हा अपराध आमच्या मर्दांनी दिल्लीत केला आहे.
 
- कॅण्टीनचा ठेकेदार रोकडा पैसा मोजूनही जेवण नावाचा प्रकार, खासकरून ‘प्रयत्न’ करूनही न तुटणार्‍या ‘रबरी’ चपात्या खायला घालतो. या चपात्यांचा बोळा खरे तर राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, मुख्य सचिव व बिपीन मलिकच्या तोंडात कोंबायला हवा. पण कॅटरिंग ठेकेदाराच्या तोंडाशी ही चपाती नेऊन ‘बाबारे, आम्ही जे कदान्न खातोय ते तू खाऊन दाखव’, असे जरा जोरात सांगितले म्हणून नसता गहजब कशाला? आता हा जो कोणी ठेकेदार आहे तो कोणत्या धर्माचा, पंथांचा, जातीचा आहे हे काय त्याच्या कपाळावर लिहून ठेवले होते?  पण तो निघाला मुस्लिम बांधव. त्याचा म्हणे उपवास सुरू होता व शिवसैनिकांनी एका मुस्लिमाचा ‘रोजा’ तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या ‘खबरा’ पद्धतशीर पेरल्या गेल्या.
 
- महाराष्ट्र सदनातील या नसत्या वादाला फोडणी देणारी मीडिया काय किंवा त्यावरून संसदेत घसा फुटेस्तोवर बोंब मारणारे मतलबी राजकारणी काय, या मंडळींना अफगाणिस्तानातील एका मौलवीने पवित्र रमजानच्याच काळात दहा वर्षांच्या चिमुरडीवर मशिदीतच केलेला बलात्कार दिसत नाही. बंगळुरू येथील एका मुस्लिम शिक्षकाने रोजा असताना शाळेतच लहान मुलीवर बलात्कार केल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. त्याबाबत मीडिया वा राजकारणी कोणीही तोंड उघडत नाही.
 
- एका चपातीवरून विनाकारण गदारोळ का घातला जातो आणि रमजानच्या पवित्र महिन्यात काही विकृत मुस्लिमांकडून झालेल्या बलात्काराबद्दल ओरड का केली जात नाही? भंपक राजकीय पक्ष-नेत्यांना "रेप चालतो, पण चपाती चालत नाही" असाच त्याचा अर्थ निघत असून हा नीचपणाचा कळसच म्हणावा लागेल. 
 
- महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार व बजबजपुरी दाबण्यासाठी असे राजकारण करणारे व त्यास धार्मिक रंग देणारे स्वत:च्याच हाताने स्वत:साठी मोठा खड्डा खणत आहेत. त्या खड्ड्यात या कॉंग्रेसवाल्यांना कायमचे गाडून त्यावर माती टाकण्याचे काम महाराष्ट्राची जनता उद्या नक्कीच करणार आहे. 
 
-  शिवसेना सर्व धर्मांचा सन्मान करते व हाच आमचा संस्कार आहे. जोपर्यंत धर्माची फालतू मिजास कोणी दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच घेणेदेणे नाही. ज्याने त्याने आपापला धर्म घरात व मनात सांभाळावा. श्रद्धांचा विषय व्यक्तिगत आहे, पण त्याचा असा राजकीय बाजार करून शिवसेनेस बदनाम करण्याचा प्रयत्न होणार असेल तर मात्र गाठ आमच्याशी आहे.

 

Web Title: Rape goes on in Ramzan, but there is no chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.