रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 09:33 IST2025-05-24T09:32:10+5:302025-05-24T09:33:38+5:30
या घोटाळ्याची कहाणी जितकी विचित्र आहे, तितकीच भयानक देखील आहे. तब्बल ११ कोटींचा हा 'स्नेक स्कॅम' सिवनीच्या केवलारी तहसीलमधून समोर आला आहे.

रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल!
आर्थिक घोटाळा सोडून चमचा घोटाळा, डांबर घोटाळा, कचरा घोटाळा ते अगदी चारा घोटाळापर्यंत अनेक प्रकारचे घोटाळे आजवर समोर आले. मात्र, मध्य प्रदेशातून आता एक असा घोटाळा समोर आला आहे, ज्याबद्दल ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल. या घोटाळ्याची कहाणी जितकी विचित्र आहे, तितकीच भयानक देखील आहे. तब्बल ११ कोटींचा हा 'स्नेक स्कॅम' सिवनीच्या केवलारी तहसीलमधून समोर आला आहे. या घोटाळ्यात अनेक जिवंत व्यक्तींना मृत दाखवून सरकारी पैशांची अफरातफर करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातून समोर आलेल्या या घोटाळ्यात ४६ जणांसाह चार तहसीलदार आणि दोन लिपिकही सामील आहेत. तपास अधिकारी रोहित कोसल यांनी माहिती देताना म्हटले की, हा घोटाळा २०१९ मध्ये सुरू झाला आणि २०२२पर्यंत चालूच होता. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याचे दाखवून नुकसान भरपाईसाठी सरकारी निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. ११.२६ कोटींचा हा घोटाळा इतक्या हुशारीने करण्यात आला की, त्याचा कुणालाच पत्ता लागला नाही.
एकाच व्यक्तीचा अनेकवेळा मृत्यू!
या 'स्नेक स्कॅम'च्या तपास अहवालानुसार, गावातील द्रौपदी नामक महिलेला तब्बल २८ वेळ मृत घोषित करण्यात आले होते. तर, रमेश नावाच्या व्यक्तीला वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये २९ वेळ मृत दाखवण्यात आले. यांच्याप्रमाणेच रामकुमारलाही १९ वेळा मृत घोषित केले गेले होते. यांच्या मृत्यूचे कारण प्रत्येक वेळी एकच होते, ते म्हणजे सर्पदंश. या ३८ बनावट नोंदींद्वारे तब्बल ८१ लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली.
२७९ काल्पनिक नावांचा वापर
केवळ जिवंत व्यक्तीच्या नाही, तर काही काल्पनिक नावाचा आधार घेऊन खोटी बिले तयार करून, सरकारी पैसे बनावट खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. सहाय्यक श्रेणी ३ कर्मचारी सचिन दहायत याने हा संपूर्ण घोटाळा करण्यासाठी अनेक तहसील आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून मध्य प्रदेश सरकारच्या आर्थिक व्यवस्थापन प्रणालीची दिशाभूल केली. मृत्यू दाखल, पोलीस पडताळणी, शवविच्छेदन सादर न करता पैसे लाटले गेले. तपास अधिकारी रोहित सिंह कौशल यांनी माहिती देताना सांगितले की, या घोटाळ्यात तब्बल २७९ नकली नावांचा वापर करण्यात आला. या खोट्या नावांचा वापर करून ४६ वैयक्तिक आणि नातेवाईकांच्या नावावर पैशांची अफरातफर झाली.
जिवंत व्यक्तीला कागदोपत्री मारून टाकलं!
ज्या द्रौपदीबाईंना मृत दाखवलं गेलं, त्यांच्या गावी जाऊन तपासणी केली असता, अशा नावाची कोणतीच महिला तिथे राहत नसल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर गेल्या २५ वर्षात तिथे कुणालाही साप चावलेला नाही. तर, कागदोपत्री सर्पदंशाने मृत झालेले ७५ वर्षीय संत कुमार बघेल, हे प्रत्यक्षात जिवंत असून आपला मोठा व्यापार सांभाळत आहेत. ज्या रमेश नावाच्या व्यक्तीला २९ वेळा मृत दाखवलं गेलं, त्यांचा मृत्यू २ वर्षांपूर्वीच झाला असून, मृत्यूचे कारण वेगळेच होते.
अधिकारीही सामील!
या संपूर्ण प्रकरणात, सहाय्यक श्रेणी-३ सचिन दहायत व्यतिरिक्त, आणखी ४६ जणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये तत्कालीन एसडीएम अमित सिंह आणि पाच तहसीलदारांची भूमिकाही संशयास्पद आढळली आहे. या अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रांचा आणि अधिकारांचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्या आधारे तिजोरीतून पैसे देण्यात आले, असे तपासात उघड झाले आहे.
जबलपूर विभागाच्या विशेष पथकाने तपास अहवाल तयार केला असून, तो सिवनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. आता पुढील कायदेशीर कारवाई सिवनी जिल्हाधिकारी करतील. जबलपूर विभागातील कोषागार आणि लेखा विभागाचे सहसंचालक आणि तपास अधिकारी रोहित सिंह कौशल म्हणाले की, तपासात स्पष्टपणे दिसून आले आहे की एकाच व्यक्तीला वारंवार मृत दाखवून नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी पैशाचा अपहार करण्यात आला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत ११ कोटी २६ लाख रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.