Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:27 IST2023-01-30T18:25:01+5:302023-01-30T18:27:33+5:30
Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे.

Ramcharitmanas Row: रामचरितमानसच्या प्रती जाळल्या; बागेश्वर सरकारचं हिंदूंना थेट आवाहन, म्हणाले...
रामचरितमानसच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वादाला तोंड फुटले आहे. अनेक ठिकाणांवरून पवित्र रामचरितमानसाच्या प्रती जाळल्याचे आणि फाडल्याचे वृत्त आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही रामचरितमानसवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. आता बागेश्वर सरकार अर्थात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदूंच्य या पवित्र ग्रंथावरू सुरू झालेल्या वादावर प्रतिक्रिया देली आहे.
रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. यामुळे आता प्रत्येक हिंदू जागृत होण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर ज्या लोकांनी रामचरितमानसचा अपमान केला, अशा लोकांसोबत संबंध ठेवायचे की नाही, त्यांच्यासंदर्भात तुम्हाला स्वत:लाच विचार करावा लागेल, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.
बागेश्वर सरकारने म्हटले आहे की, रामचरितमानसचा अपमान करणाऱ्यांनी भारत सोडायला हवा. या लोकांनी भारतात राहू नये. रामचरितमानसचा अपमान करून या लोकांनी भारतात राहण्याचा अधिकार गमावला आहे. यांच्या विरोधात सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. याच बरोबर त्यांनी रामचरितमानस हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित व्हावा अशी मागणीही केली आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांनी सरकारकडे निवेदनही केले आहे.
रामचरितमानसच्या प्रती जाळल्याच्या घटनांवर राग व्यक्त करत, हे एक 'अंतरराष्ट्रीय षडयंत्र' आहे. हा प्रकार म्हणजे सनातन धर्माविरोधातील कट आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व सनातनींना संघटित व्हावे लागेल, असेही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.