Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 14:28 IST2023-04-21T14:27:55+5:302023-04-21T14:28:35+5:30
Ayodhya Temple: दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे.

Ram Mandir: जगभरातील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत दाखल; 23 एप्रिल रोजी रामललाचा जलाभिषेक सोहळा
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील भगवान रामाच्या भव्य मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षी हे मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. दरम्यान, येत्या 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामललाचा जलाभिषेक होणार आहे. यासाठी पाकिस्तान, चीन आणि उझबेकिस्तानसह अनेक देशांतील 155 नद्यांचे पाणी अयोध्येत आणले गेले आहे. दिल्लीचे भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांनी हे पाणी गोळा करण्याचे काम केले आहे.
अयोध्येत रामललाचा जलाभिषेक
विजय जॉली म्हणाले की, नायजेरिया, टांझानिया, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आदी देशांतून नदीचे पाणी आणले आहे. एवढंच नाही तर रामललाच्या अभिषेकासाठी अंटार्क्टिकाचे पाणीही अयोध्येत पोहोचले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 23 एप्रिल रोजी अयोध्येतील मणिराम दास छावणी सभागृहात जल कलशाची पूजा करतील.
पाकिस्तानातून पाणी कसे आणले?
उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील देशांमधून आणलेल्या 155 नद्यांच्या पाण्यावर त्या-त्या देशांचे झेंडे, त्यांची नावे आणि नद्यांची नावे असलेले स्टिकर्स आहेत. अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध देशांचे राजदूतही सहभागी होणार आहेत. रामललाच्या जलाभिषेकासाठी पाकिस्तानातूनही नदीचे पाणी आणण्यात आले आहे. पाकिस्तानातील हिंदूंनी आधी दुबईला पाणी पाठवले आणि नंतर दुबईहून ते दिल्लीत आणले. यानंतर विजय जॉली यांनी हे पाणी अयोध्येत आणले.