२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 11:12 IST2025-10-30T11:11:45+5:302025-10-30T11:12:22+5:30
Ayodhya Ram Mandir: २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात भव्य सोहळा होणार आहे. या दिवशी सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद असणार आहे.

२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
Ayodhya Ram Mandir: राम जन्मभूमी मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण झाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. संपूर्ण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत येत आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जसा भव्य सोहळा करण्यात आला होता, तसाच भव्य सोहळा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे ८ हजार निमंत्रणे गेली आहेत. त्यामुळे या दिवशी सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद राहणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या समारंभात फक्त निमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात जाण्याची परवानगी असेल. सुमारे ८ हजार लोकांना आमंत्रित केले जाईल. तशी व्यवस्था केली जात आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सामान्य भाविकांसाठी पुन्हा एकदा राम मंदिरात रामललाचे दर्शन सुरू होणार आहे.
प्रत्येक गोष्ट भक्तांना समर्पित
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट सर्व भागात सुरक्षा तपासणीशिवाय भाविकांना मुक्तपणे फिरता येईल का, याचा विचार करत आहे. येथे बांधलेली प्रत्येक गोष्ट भक्तांना समर्पित असावी, असा सतत प्रयत्न असतो. या वर्षाच्या अखेरीस श्रीराम जन्मभूमी संकुलातील सर्व मंदिरे, उद्याने आणि कुबेर टीला खुले करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती न असेही नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण
पुढे ते म्हणाले की, काही ठिकाणी मर्यादित संख्येनेच लोक भेट देऊ शकतात. जसे की, कुबेर टीला येथे मर्यादित संख्येनेच भाविक येऊ शकतात. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबारातील संख्या मर्यादित असेल. ट्रस्ट प्रत्येक जबाबदारीत पूर्णपणे गुंतलेला आहे. आमचे प्रयत्न आहेत की, काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे आणि भक्तांना कळवावे की, ट्रस्टने आमच्यावर सोपवलेले बांधकाम काम पूर्ण झाले आहे. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी राम दरबारात करणार आरती
मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘राम परिवार’ आसनस्थ झाला असून मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या शीर्षस्थानी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार असल्याचे ट्रस्ट संचालकांनी सांगितले.
दरम्यान, राम मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे. आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे.