अयोध्येत रामभक्तांची रीघ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा; ५६ पदार्थांचा नैवेद्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:13 IST2025-01-12T07:09:08+5:302025-01-12T07:13:39+5:30
गेल्यावर्षी दि. २२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता.

अयोध्येत रामभक्तांची रीघ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा; ५६ पदार्थांचा नैवेद्य
अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राममंदिरातील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामील झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लाला अभिषेक केला.
२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. परंतु, हिंदू पंचांगातील ‘तिथी’नुसार यंदाचा वर्धापन सोहळा ११ ते १३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली. राममंदिराच्या प्रांगणात शनिवारी यजुर्वेद पठणाने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. या मंदिराला फुलांची आरास करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दि. २२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता.
देशभरातील ११० मान्यवरांना निमंत्रण
त्याला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात सहभागी झालेले अनुप मिश्रा यांनी सांगितले की, जानेवारी २०२४मध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी रामजन्मभूमीत येणे मला शक्य झाले नव्हते. पण त्या सोहळ्याच्या प्रथम वर्धापनदिनी येण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
सोहळ्याच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शनिवारपासून विशेष सोहळा सुरू झाला असून, तो दि. १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यासाठी ११० मान्यवरांसह अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील अंगद टिला परिसरात पाच हजार लोकांच्या वास्तव्यासाठी तंबू उभारण्यात आले आहेत.
दररोज पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी, ‘रामकथा’ प्रवचन होणार आहे. दि. २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
आध्यात्मिकतेचे महान प्रतीक : पंतप्रधान
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, राममंदिरात विराजमान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. अनेक शतकांच्या त्याग, तपस्या, संघर्षानंतर बांधलेले मंदिर संस्कृती व आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. हे भव्य राममंदिर विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रेरणास्रोत ठरेल.
तीन कोटींहून अधिक भक्तांनी घेतले दर्शन
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीनंतर मागील वर्षभराच्या कालखंडात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. या मंदिराचे तीन मजले पूर्ण झाले आहेत. सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असून, ते दोन महिन्यांत पूर्ण होईल.