हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:09 IST2025-08-09T12:08:31+5:302025-08-09T12:09:09+5:30
Raksha Bandhan Emotional Story: आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे.

हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
रक्षाबंधनाची बहीण-भाऊ आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकांच्या भाग्यात बहीण नसते, अनेकांच्या भाऊ. अनेकांच्या आयुष्यातून भाऊ-बहीण निघून गेलेले असतात कायमचे. आज अनेकांच्या हातात राखी बांधलेली नसेल. पण वलसाडच्या रक्षाबंधनाने ज्यांना बहीण, भाऊ आहेत, त्यांच्याही डोळ्यात पाणी आणले आहे. हे जग सोडून गेलेल्या एकुलत्या एका बहिणीच्या जिवंत हाताने आज वलसाडमध्ये भावाला राखी बांधली आहे.
गुजरातच्या रिया या लहान मुलीचे गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ ला निधन झाले होते. तिचा ब्रेन डेड झाला होता. तिच्या कुटुंबाने तिचे अवयव दान केले होते. याच रियाचे हात मुंबईच्या १५ वर्षीय अनमता अहमद या मुलीला जोडण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागल्याने तिला हात गमवावा लागला होता. रियाच्या खऱ्या भावाला रियाच्या खऱ्या जिवंत हाताने राखी बांधण्यासाठी अनमता मुंबईहून गुजरातला गेली होती.
शिवमने अनमताकडून राखी बांधून घेतली तो क्षण खूप भावूक करणारा होता. यातून कोणताही धर्म नाही तर मानवतेचा धर्म सर्वात मोठा आहे, हा संदेश जगभरात देण्यात आला. शिवम दहावीत शिकतो तर अनमता ही ११वीत. एका घटनेने शिवमची बहीण त्याच्यापेक्षा मोठी झाली आहे. रियाच्या पालकांनी अनामताला घट्ट मिठी मारली. एकीकडे आपली मुलगी या जगात नाही, आपली बहीण या जगात नाही अशी भावना होती, दुसरीकडे आपल्याच मुलीचे जिवंत हात समोर दिसत होते. कसा असेल तो क्षण... रियाचे मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि कॉर्निया इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे.