राखी सावंतने दिला पंजाब पोलिसांना गुंगारा, अटक नाही
By Admin | Updated: April 4, 2017 20:30 IST2017-04-04T20:22:12+5:302017-04-04T20:30:13+5:30
आयटम गर्ल राखी सावंतला अटक केल्याच्या वृत्ताला पंजाब पोलिसांनी नकार दिला

राखी सावंतने दिला पंजाब पोलिसांना गुंगारा, अटक नाही
>ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 4 - आयटम गर्ल राखी सावंतला अटक केल्याच्या वृत्ताला पंजाब पोलिसांनी नकार दिला आहे. पंजाबच्या लुधियाना पोलिसांचं पथक राखी सावंतला अटक करण्यासाठी मुंबईला तिच्या घरी पोहोचलं होतं पण त्यावेळी राखी घरी सापडली नाही अशी माहिती लुधियानाचे पोलीस आयुक्त कुंवर विजय प्रताप सिंग यांनी दिली. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
यापुर्वी राखी सावंतला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त दुपारी आलं होतं. पण राखीला अटक करण्यात अपयश आल्याचं पंजाब पोलिसांकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे. लुधियाना पोलिसांचं एक पथक राखीला अटक करण्यासाठी मुंबईला तिच्या राहत्या घरी पोहोचलं होतं पण त्यावेळी ती घरी सापडली नाही, राखीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबबात न्यायालयाला माहिती दिली जाईल, अशी माहिती लुधियानाचे पोलीस उपायुक्त ध्रुमान निंबले यांनी दिली.
काय आहे प्रकरण-
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाला अनुसरुन भगवान वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. तेव्हापासून राखीवर वाल्मिकी समाजाचा रोष ओढावला. या घटनेनंतर राखीला स्थानिक न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही तिने न्यायालयात हजर राहिली नाही. 9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही ती हजर न राहिल्याने अखेर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला.