राखीच्या विधानांनी आठवले घायाळ !
By Admin | Updated: August 12, 2014 02:00 IST2014-08-12T02:00:48+5:302014-08-12T02:00:48+5:30
अभिनेत्री राखी सावंत हिच्या बेधडक विधानांनी रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले घायाळ झाले आहेत.

राखीच्या विधानांनी आठवले घायाळ !
नवी दिल्ली : अभिनेत्री राखी सावंत हिच्या बेधडक विधानांनी रिपाइंचे अध्यक्ष खा.रामदास आठवले घायाळ झाले आहेत. मोदी, आर.आर.पाटील व राज ठाकरे यांच्याबाबत तिची विधाने थांबवून त्यांनी हस्तक्षेप करत आपली मते स्पष्टपणे मांडली. पत्रकार परिषदेतील तिचा बोलबाला राजकीयदृष्ट्या अपरिपक्व होताच, पण केवळÞ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील साऱ्याच राज्यातून लोकांचा सर्वाधिक राबता असणाऱ्या आठवलेंना प्रसंगी त्रासदायक ठरू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे साऱ्याच खासदारांकडे लक्ष असते, त्यांच्या हालचाली, राजकीय कार्यक्रम व विधाने यांची बारीकसारिक माहिती मोदींकडे पोहोचते. महाराष्ट्रातील खासदारांना त्यांनी ज्या पध्दतीने झापले ते पाहता खासदार अत्यंत सावधगिरीनेच वागतात. अशावेळी राखीची विधाने कोणते वळण घेतील याचा अंदाज घेतला जात आहे.
रिपाइंच्या राष्ट्रीय परिषदेसाठी महिला आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष असलेली राखी सावंत राजधानीत आली. तिच्या आगमनासाठी दिल्ली विमानतळ ते काँॅस्टीट्यूशन क्लब या मार्गावर रामदास आठवले यांच्या सोबत राखीचे छायाचित्र असलेले फ्लेक्स लावले होते. निळ्या पहेरावात व च्युर्इंगम चघळत ती पत्रपरिषदेला आली.
आठवलेंनी तिची ओळख करून देण्याअगोदर लोकसभेतील रेखाच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राखी मराठी आहे. तिची आई गुजराती आहे. त्यामुळे रेखा जर राज्यसभेत येत नसेल तर त्याजागी राखीला सदस्य करा, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करू. त्यावर राखी म्हणाली,मी अर्धी गुजरातीच आहे. त्यामुळे माझे हित मोदी बघतील. मोदींकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. आम्ही अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहोत. मोदींनी आठवलेंना मंत्री करावे. चहा विकणारा जर पंतप्रधान होऊ शकतो, तर आठवले का नाही होऊ शकत, असे बेधडक विधान तिने करताच आठवलेंनी लागलीच माईकचा ताबा घेतला आणि ते म्हणाले, पंतप्रधानांच्या मनात येईपर्यंत मला मंत्रीपद नकोय आणि पंतप्रधानपद तर मला कधीच नकोय.!! तेवढ्यात तिने महाराष्ट्रातील महिलांवर किती अत्याचार होत आहेत, हे सांगण्यासाठी एका महिलेला मी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे घेऊन गेलो. तिच्यावरील अन्याय त्यांना कळावा म्हणून एक कागद दिला. तर गृहमंत्री म्हणाले, हा तर एफआयआर आहे. मी त्यांना म्हणाले,सर आपल्याला एफआयआर आणि एनसी (अदखलपात्र) हा फरक कळत नसेल तर कसे होतील अत्याचार दूर, असा प्रश्न तिने केला. हा किस्सा तिने सांगताच,आठवलेंनी तिच्या कानात म्हटले, नको सांगू हा प्रसंग. तेव्हा ती म्हणाली, आठवलेजी घाबरू नका,मला बोलू द्या..! तिसरा मुद्दा तिला राज ठाकरे यांच्याविरूध्द निवडणूक मैदानात उतरवणार काय, त्यावर तिने आठवलेंकडे पाहिले व म्हटले, अजून निर्णय झाला नाही. तेव्हा आठवले म्हणाले, काय बोलणार यावर. राखी तिकीट मागायला पक्षात आलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)