परिणीती चोप्रावरून राज्यसभेच्या सभापतींनीही काढला ‘चिमटा’; उपस्थितांमध्ये पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 09:09 IST2023-03-26T09:08:48+5:302023-03-26T09:09:19+5:30

धनखड हे नियम २६७ अन्वये नोटीस देणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांच्या नोटिसांच्या विषयाबाबत सभागृहाला माहिती देत होते.

Rajya Sabha MP Raghav Chadha and Bollywood actress Parineeti Chopra were spotted together outside a restaurant in Mumbai. | परिणीती चोप्रावरून राज्यसभेच्या सभापतींनीही काढला ‘चिमटा’; उपस्थितांमध्ये पिकला हशा

परिणीती चोप्रावरून राज्यसभेच्या सभापतींनीही काढला ‘चिमटा’; उपस्थितांमध्ये पिकला हशा

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचे एकत्र फोटो-व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शुक्रवारी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनीही यावरून चढ्ढा यांना चिमटा काढला. 

धनखड हे नियम २६७ अन्वये नोटीस देणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांच्या नोटिसांच्या विषयाबाबत सभागृहाला माहिती देत होते. मेहुल चोक्सीच्या रेड कॉर्नर नोटीसबाबत चड्ढा यांना बोलायचे होते. क्रमाने राघव चढ्ढा यांचे नाव येताच धनखड यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. सभापतींनी सूचनेचा विषय वाचून दाखवल्यावर चढ्ढा यांना काही बोलायचे होते; पण हसत हसत ‘तुम्ही सोशल मीडियात आधीच पुरेशी जागा घेतली आहे, त्यामुळे आजचा दिवस कदाचित तुमच्यासाठी मौनाचा दिवस आहे’ असे सभापती म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

तत्पूर्वी, सकाळी पत्रकारांनी परिणीतीबाबत विचारल्यावर ‘राजनीती पर सवाल पूछो, परिणीती पर नहीं’ असे चड्ढा हसतच म्हणाले, लग्नाबाबत विचारल्यावर ‘आपको बताएँगे, जब शादी करेंगे’ असे ते म्हणाले आणि निघून गेले. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तथापि, परिणीती-राघव दोघांनीही अद्यापतरी सोशल मीडियातील चर्चेबाबत काहीही जाहीर केलेले नाही, नेटकरी मात्र आपापला अंदाज बांधत आहेत.

Web Title: Rajya Sabha MP Raghav Chadha and Bollywood actress Parineeti Chopra were spotted together outside a restaurant in Mumbai.