शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 03:01 PM2018-02-06T15:01:11+5:302018-02-06T15:03:16+5:30

युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल.

Rajouri ceasefire violation Talk to Pakistan or go for war says father of soldier killed in shelling | शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

शहिदाच्या वडिलांचा उद्वेग; चर्चेतून तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा!

Next

काश्मीर: एकतर पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर पाकविरोधात थेट युद्ध पुकारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजौरी हल्ल्यातील शहीद हवालदार रोशन लाल यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले होते. यामध्ये सीमारेषेलगतच्या सांबा आणि कटुआ या दोन गावांमधील जवानांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर शहीद रोशन लाल यांचे वृद्ध वडील देशराज पराशर यांच्यासह गावकऱ्यांनी केंद्र सरकारकला एक संदेश पाठवला आहे. एकतर तुम्ही पाकिस्तानशी चर्चा करून कायमचा तोडगा काढा, नाहीतर एकदाचे युद्ध करून काश्मीरमध्ये कायमची शांतता प्रस्थापित करा, असे देशराज पराशर यांनी म्हटले. 

रोशन लाल यांचे चुलत भाऊ संजय यांनीही दोन्ही देशांमधील तणावामुळे सीमारेषेरवरील गावकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा मांडला. या सगळ्यावर युद्ध हा अंतिम तोडगा नाही, हे आम्हाला माहिती आहे. परंतु, दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावामुळे आमच्या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही. पाकिस्तानकडून गोळीबार होतो, मग आपले जवान त्याला प्रत्युत्तर देतात, हे नेहमीच सुरु असते. मात्र, या सगळ्यात आमच्या मुलांना जीव गमवावा लागत आहे. युद्ध झाले तर निदान लोकांना पाकिस्तानला धडा शिकवल्याचे समाधान मिळेल, असे त्यांनी सांगितले. 
शहीद रोशन लाल राहत असलेल्या नीचला या गावात 300 लोक राहतात. त्यापैकी 40 हून अधिकजण सैन्यात आहेत. रोशन लाल हे देशसेवा करताना शहीद झालेले गावातील पहिलेच जवान आहेत. तर येथूनच साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकूंदपूर येथील रायफलमन शुभम सिंह हेदेखील राजौरीमध्ये शहीद झाले होते. काही दिवसांतच त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्यासाठी त्यांच्या घराचे काम सुरू होते. हे काम बघायला शुभम सिंह एका महिन्याची सुट्टी काढून घरी परतले होते. 28 जानेवारीला ते पुन्हा कामावर रुजू झाले होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.  
 

Web Title: Rajouri ceasefire violation Talk to Pakistan or go for war says father of soldier killed in shelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.