"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:35 IST2025-12-08T19:35:06+5:302025-12-08T19:35:29+5:30
वंदे मातरम् वर चर्चा सुरु असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
Rajnath Singh: राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षाच्या निमित्ताने आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. या चर्चेवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आपले मत मांडताना काही खासदारांनी मध्येच त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला.. यावर राजनाथ सिंह चांगलेच भडकले आणि त्यांनी जोरदार शब्दांत संसदेच्या नियमावलीची आठवण करून दिली. राजनाथ सिंह विरोधी बाकांवरील खासदारांवर संतापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
राजनाथ सिंह भारतीय मुस्लिमांनी 'वंदे मातरम्'च्या भावना कशा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्या, याबद्दल बोलत होते. "सत्य हे आहे की भारतीय मुस्लिमांनी बंकिमचंद्र (चट्टोपाध्याय) यांच्या भावनेला..." एवढ्यात सदनातील काही खासदारांनी गोंधळ सुरू केला. या गोंधळावर राजनाथ सिंह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि जोर देत म्हटले, "कोण बसवणार आहे मला? कोण बसवणार? काय बोलताय तुम्ही? अध्यक्ष महोदय, यांना थांबवा," असं म्हटलं.
यावेळी त्यांनी सदस्यांना संसदेची मर्यादा समजावून सांगितली. "संसदेत कोणी काहीही बोलले, अगदी सत्यापासून थोडे दूरही बोलले, तरी त्यावर गोंधळ घालू नये. तुम्ही नंतर उभे राहून त्याचे खंडन करू शकता. ही संसदेची मर्यादा आहे आणि मी नेहमीच याचे पालन केले आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.
'भारतीय मुस्लिमांनी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्या'
आपले अपूर्ण राहिलेले बोलणे पूर्ण करताना राजनाथ सिंह म्हणाले, "सत्य हे आहे की, भारतीय मुस्लिमांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या भावनेला काँग्रेस किंवा मुस्लिम लीगच्या नेत्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले.
Rajnath Singh ji 🔥🔥 pic.twitter.com/EZb4xCpS9R
— Being Political (@BeingPolitical1) December 8, 2025
'वंदे मातरम्'वर झालेले अन्याय
राजनाथ सिंह यांनी 'वंदे मातरम्' हे कोणतेही राजकीय किंवा जातीयवादी संकल्पना नसून, ते राष्ट्रप्रेमाचे आवाहन असल्याचे स्पष्ट केले. या गीताला कट्टरपंथी आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने चुकीचा रंग दिला. "वंदे मातरम् आणि आनंदमठ कधीही इस्लामच्या विरोधात नव्हते. १९३७ मध्ये काँग्रेसने हे गीत खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. वंदे मातरम् सोबत झालेला राजकीय छळ आणि अन्याय सर्व पिढ्यांना माहीत व्हायला हवा," असेही राजनाथ सिंह म्हणाले.
"आजही आझाद भारतात राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत या दोहोंना समान दर्जा मिळायला हवा होता, परंतु त्यापैकी एक मुख्य प्रवाहात आला, पण दुसऱ्या गीताला खंडित करून बाजूला सारले गेले, त्याला केवळ एक एक्स्ट्रा म्हणून पाहिले गेले," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.