राजीव गांधी खुन्यांच्या शिक्षामाफीस केंद्राचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 04:35 IST2018-06-21T04:35:45+5:302018-06-21T04:35:45+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या तीन परदेशी व चार भारतीय गुन्हेगारांची शिक्षा माफ केल्यास ‘घातक पायंडा पडेल

राजीव गांधी खुन्यांच्या शिक्षामाफीस केंद्राचा नकार
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल जन्मठेप भोगत असलेल्या तीन परदेशी व चार भारतीय गुन्हेगारांची शिक्षा माफ केल्यास ‘घातक पायंडा पडेल व त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटतील’, असे म्हणून या खुन्यांच्या शिक्षेला माफीस देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगन, ए.जी. पेरारीवलन, टी. सुतेंद्रराजा ऊर्फ संथान, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी हे राजीव गांधींचे खुनी जन्मठेप भागत आहेत. त्यांची शिल्लक राहिलेली शिक्षा माफ करून, त्यांची सुटका करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला होता. मात्र हा अभियोग सीबीआयने चालविला होता. त्यामुळे केंद्र सरकाराच्या संमतीविना राज्य सरकार त्यांची सुटका करू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडे औपचारिक संमतीसाठी प्रस्ताव पाठविला होता.
>१६ जणांनी गमावले होते प्राण
राजीव गांधींच्या हत्येचा भयंकर कट सुसंघटित अशा परदेशी दहशतवादी संघटनेने रचला होता व त्यामुळे नऊ पोलिसांसह एकूण १६ जणांना प्राण गमवावे लागण्याखेरीज या हत्येने देशाच्या लोकशाही प्रक्रियेसही खीळ बसली होती, असेही केंद्र सरकारने नमूद केले.