बाबो! तलाव आहे की भंगार दुकान? एकापोठापाठ एक १० दुचाकी निघाल्या; चकीत झालेले पोलीस बघतच बसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:39 IST2021-07-02T12:37:34+5:302021-07-02T12:39:51+5:30
दोघांनी एकूण १५ दुचाकी चोरल्या; पोलिसांना आतापर्यंत १० सापडल्या

बाबो! तलाव आहे की भंगार दुकान? एकापोठापाठ एक १० दुचाकी निघाल्या; चकीत झालेले पोलीस बघतच बसले
टोंक: राजस्थानच्या टोंक शहरात पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक केली आहे. नशा करण्यासाठी पैसे मिळावेत यासाठी दोघेजण दुचाकी चोरत असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. केवळ २००-३०० रुपयांसाठी दोघे चोर मोटारसायकल आणि स्कूटर चोरत होते. चोरलेल्या दुचाकीमधील पेट्रोल काढून दोघे ते विकायचे आणि त्यातून मिळालेल्या पैशातून नशा करायचे.
चोरलेल्या दुचाकीतील पेट्रोल आणि सहज निघणारे सुटे भाग विकण्याचं काम दोघे चोरटे करायचे. त्यानंतर दुचाकी एका तलावात आणून फेकून द्यायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तलावातून ९ मोटारसायकल आणि १ स्कूटर काढली आहे. एकूण १५ दुचाकी चोरल्याची माहिती चोर दुकलीनं पोलिसांना दिली आहे. त्यामुळे उर्वरित दुचाकींचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. चोरट्यांनी दुचाकींमधून काढलेले सुटे भागदेखील पोलिसांना एका गोणीत सापडले आहेत.
शहरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना होत असल्यानं पोलीस अधीक्षक ओम प्रकाश यांनी प्रकरण गांभीर्यानं घेतलं. त्यांनी चोरांना पकडण्याची जबाबादारी जिल्हा विशेष पथकाकडे (डीसीटी) सोपवली. डीसीटीनं शहरात वास्तव्यास असलेल्या फैसल आणि युसूफला अटक केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
२०० ते ३०० रुपयांसाठी टोंक शहरात १५ दुचारी चोरल्याची कबुली दोघांनी दिली आहे. 'नशा करण्याची सवय असल्यानं त्यासाठी पैसे हवेत म्हणून २०० ते ३०० रुपयांच्या दुचाकी चोरल्या. त्यातून पेट्रोल आणि काही सुटे भाग काढून घेतले आणि त्यानंतर दुचाकी शहराच्या मधोमध असलेल्या तलावात फेकल्या,' अशी माहिती दोघांनी पोलिसांना दिली.