राजस्थानच्या सवाई माधोपूर रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली. जंगलाच्या मध्यभागी झोन क्रमांक-६ मध्ये सफारीदरम्यान अचानक पर्यटकांचा कॅन्टर अचानक बिघडला. त्यावेळी पर्यटकांसोबत असलेल्या एका वन कर्मचारी त्यांना तिथेच सोडून निघून गेला. दरम्यान, संध्याकाळी ०६.०० ते ७.३० वाजेपर्यंत जंगलात एकटे थांबावे लागले. पर्यटकांना मदत वेळेवर पोहोचली नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात लहान मुले मोबाईलच्या प्रकाशात बसलेली दिसत आहेत.
पर्यटकांनी सांगितले की, त्यांनी वारंवार मदतीसाठी वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, वन विभागाकडून मदत वेळेवर पोहोचली नाही. शेवटी, एक पर्यटक दुसऱ्या जिप्सीमध्ये बसला आणि राजबाग नाका चौकी पोहोचला. तिथून त्याने एक वाहन घेऊन उर्वरित पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. तक्रारीनंतर, वन विभागाने सुमारे अडीच तास उशीरा दिवे नसलेला कॅन्टर पाठवला. यामुळे पर्यटक आणि राजबाग नाका चौकी येथे तैनात असलेले वनरक्षक विजय मेघवाल यांच्यात वाद झाला.
याप्रकरणी रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन डीएफओ प्रमोद धाकड यांनी कठोर कारवाई केली. कॅन्टर मार्गदर्शक मुकेश कुमार बैरवा (द्वितीय), कॅन्टर चालक कन्हैया, शहजाद चौधरी आणि लियाकत अली यांना पुढील आदेशापर्यंत उद्यानात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. दरम्यान, १६ ऑगस्टच्या संध्याकाळच्या शिफ्टमध्ये, कॅन्टर क्रमांक RJ25-PA-2171 जंगलात बिघडला. वेटिंग ड्युटीवर असलेला कॅन्टर क्रमांक RJ25-PA-2230 नियमानुसार , गेटवर उपलब्ध नव्हता आणि खूप उशिरा पोहोचला. मार्गदर्शक मुकेश कुमार बैरवा पर्यटकांना जंगलात सोडून बाहेर गेले आणि इतर चालकांनीही वन अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले नाही, असे डीएफओने आपल्या आदेशात म्हटले.
दरम्यान, रणथंभोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अनुप के.आर. म्हणाले की, "उद्यानात पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही मार्गदर्शक किंवा चालकावर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असा निष्काळजीपणा सहन केली जाणार नाही."