राजस्थानमध्ये रात्री उशीरा झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास डूंगरगडमधील शीखवाल उपवनजवळ राष्ट्रीय महामार्ग-११ वर दोन कारमध्ये भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कटरने कापून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले.
दोन्ही कार लोकप्रिय तीर्थक्षेत्र असलेल्या खाटूश्याम मंदिराच्या दर्शनातून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मयत राजस्थानच्या डूंगरगड येथे राहायला होते. मनोज जाखर, करण, सुरेंद्र कुमार, दिनेश आणि मदन सरन अशी मृतांची नावे आहेत. तर, संतोष कुमार, मल्लुराम, जितेंद्र आणि लालचंद, अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर पीबीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात दोन्ही कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला.