रोजा मोडल्याने राज्यसभेत गदारोळ
By Admin | Updated: July 25, 2014 01:50 IST2014-07-25T01:50:21+5:302014-07-25T01:50:21+5:30
शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनातील मुस्लीम कर्मचा:याच्या तोंडात चपाती कोंबत त्याचा रोजा मोडल्याच्या मुद्यावर गुरुवारी राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला.

रोजा मोडल्याने राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली : शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनातील मुस्लीम कर्मचा:याच्या तोंडात चपाती कोंबत त्याचा रोजा मोडल्याच्या मुद्यावर गुरुवारी राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणी सर्व तथ्य जाणून घेतल्यानंतर शुक्रवारी उत्तर देण्याची भूमिका सरकारने घेतली.
रोजा मोडल्याचे प्रकरण उपस्थित करून 24 तास उलटले असताना सरकारने काहीही केलेले नाही, असे सांगत काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि डाव्यांनी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सरकारचा खुलासा मागितला. त्यावर संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू म्हणाले की, हा मुद्दा संसद सदस्यांशी संबंधित असून तो राज्य सरकारच्या इमारतीत(महाराष्ट्र सदन) घडलेला आहे. हे अतिशय संवदेनशील आणि गंभीर प्रकरण आहे. लोकसभा अध्यक्षांनी बुधवारी संसदीय कार्य राज्यमंत्र्यांना या प्रकरणी तथ्य जाणून घेण्याचा आदेश दिला आहे. आम्ही तथ्य जाणून घेत आहोत. पूर्ण तपशील मिळाल्यानंतरच आम्ही त्याबाबत उत्तर देऊ. त्यावर समाधान न झालेल्या विरोधकांनी सरकार या मुद्यावर मौन पाळत असल्याचा आरोप केला. सरकारने सभागृहात निवेदन देणार असल्याचे आश्वासन देऊन 24 तास उलटले आहेत, असे माकपचे सीताराम येचुरी म्हणाले. सरकार मुके-बहिरे झाले आहे, असे काँग्रेसचे सत्यव्रत चतुव्रेदी यांनी म्हटले. त्यावर नायडू यांनी शुक्रवारी सरकार उत्तर देईल असे आश्वासन दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला. अर्थसंकल्पावरील चर्चेलाच प्राधान्य दिले जाणार असून चर्चेत अडथळे येणार असतील तर आपण ती पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊन जाऊ द्या. सकाळच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली असून 12 वाजता थेट अर्थसंकल्पावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, असे त्यावर सभापती हमीद अन्सारी यांनी स्पष्ट केले. हा गंभीर मुद्दा असून सरकारने निवेदन द्यावे, असे काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी म्हटले. सरकारने सत्य जाणून घेतले काय, असा प्रश्न येचुरी यांनी केला.