उपेंद्र कुमार -
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलेले असल्याचा दावा केला. त्याबाबत केलेल्या पडतळाणीत एकच व्यक्ती चार ठिकाणी मतदार असल्याचे आढळून आले आहे.
राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले. तसेच त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या एपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या या दाव्याची पडताळणी केली असताना आदित्य श्रीवास्तव चार ठिकाणी मतदार असल्याचे दिसून आले आहे.
‘लोकमत’ने केलेल्या ‘फॅक्ट चेक’मध्ये काय आढळले?
कर्नाटकात नाव होते का?उत्तर : आदित्य श्रीवास्तवचे नाव कर्नाटकच्या यादीत होते. त्यांचा एपिक क्रमांक FPP6437040 होता. महादेवपुरा मतदारसंघाच्या यादीत त्यांचे नाव होते. कर्नाटकातच दुसऱ्या यादीतही नाव होते का?उत्तर : आदित्य श्रीवास्तवचे नाव महादेवपुरा मतदारसंघाच्या एकाच मतदान केंद्रावरील दुसऱ्या बुथवरील मतदार यादीतही नाव होते. त्यांचा एपिक क्रमांकही तोच FPP6437040 होता. उत्तर प्रदेशात नाव होते का?उत्तर : आदित्य श्रीवास्तवचे नाव उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्यात लखनौ पूर्व मतदारसंघात दिल्ली पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रासाठीच्या यादीत होते. शिवाय एपिक क्रमांकही तोच FPP6437040 होता. महाराष्ट्रात नाव होते का?उत्तर : आदित्य श्रीवास्तवचे नाव महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन गार्डन मतदान केंद्रावरील मतदार यादीत होते. शिवाय एपिक क्रमांक तोच FPP6437040 होता.