लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) एक पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोटाळा आणि बोगस मतदारांचा मुद्दा मांडला. राहुल गांधींनी कर्नाटकातील एका मतदारसंघात एका घराच्या पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी झाल्याचे पुरावे मांडले. याच प्रकरणासंदर्भात तेथील बूथ लेव्हल अधिकाऱ्याने याबद्दलचे कारण सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंगळुरू मध्य मतदारसंघातील मुनी रेड्डी गार्डनर परिसरातील एका १०-१५ चौरस फूट घरात ८० मतदार कसे? असा प्रश्न देशभरात चर्चिला गेला. याबद्दल तेथील बूथ लेव्हल ऑफिसरने आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना सविस्तर खुलासा केला.
हो, त्या घराच्या पत्त्यावर ८० मतदार
बीएलओ अर्थात बूथ लेव्हल ऑफिसर मुनीरत्न यांनी सांगितले की, त्या घराच्या पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी आहे, ही बाब खरी आहे. पण, पूर्ण सत्य वेगळं आहे. स्थलांतरित कामगारांकडून मतदार नोंदणी करताना भाडे कराराचा वापर केला गेला आहे, जेणेकरून त्यांना मतदान ओळखपत्र मिळावेत.
मुनीयप्पा रेड्डी गार्डनरमधील घर क्रमांक ३५ मध्ये ८० मतदारांची नोंदणी आहे. हे घर खूप छोटे आहे. १० बाय १५ चौरस फुटांचे आहे. या भागात बहुतांश लोक भाडेकरूच आहेत. आणि त्यांचे स्थलांतरित होणे सुरूच असते, असे बीएलओ मुनीरत्न यांनी सांगितले.
एकाच पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी कशी?
मुनीरत्न यांनी सांगितले की, "14 वर्षांपासून या घरामध्ये कोणीही कायम राहिलेला नाही. नोकरी, बँक खाते किंवा गॅस कनेक्शनसाठी रहिवाशी पत्ता आवश्यक असतो. त्यामुळे ते भाडेकरार करता आणि मतदार ओळखपत्र बनवतात. नंतर घर सोडून जातात, पण मतदार यादीतील नाव तसेच राहिले आहे."
"२०१४ पूर्वी ज्या लोकांनी या पत्त्यावर मतदार यादीत नाव समाविष्ट केले होते, त्यांच्या नावाची यादी बनवून आयोगाकडे दिली गेली होती. जेणेकरून त्यांची मतदार यादीतील नावे हटवली जावीत, पण आयोगाच्या नियमानुसार त्यांची नावे हटवणे अजून बाकी आहे. कारण निवडणुकीवेळी लोक येतात आणि मतदान करून जातात", असे बीएलओ मुनीरत्न यांनी सांगितले.
हे बोगस मतदाराचे प्रकरण नाही, तर...
"हे काही बोगस मतदाराचा प्रकार नाहीये. लोकांची नोंदणी झालेली आहे, जे आता इतर ठिकाणी राहतात. या छोट्या घरात एकाच वेळी ८० लोक राहू शकत नाही. ना कधी राहिले आहेत. सध्या या घरात एक दाम्पत्य राहते", असेही बूथ अधिकाऱ्याने सांगितले.