Rahul Gandhi's allegations against Election Commission : मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर 'मत चोरी'चे आरोप सुरू केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावेही दाखवले आहेत. बंगळुरु, महाराष्ट्र येथील पुरावे देत त्यांनी 'मत चोरी' झाल्याचा आरोप केले. या प्रकरणी निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शपथपत्र दाखल करण्यास सांगितले. तर काल कर्नाटक निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्यास सांगितले. तर दुसरीकडे आज दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. दरम्यान, राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी निवडणूक आयोगावर आणखी आरोप केले आहेत.
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज सोमवारी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत ( Election Commision ) मोर्चा काढला, पण पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले आणि सर्वांना ताब्यात घेतले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
'निवडणूक आयोगाचा डेटा फुटेल'
मोर्चादरम्यान, माध्यमांनी राहुल गांधींना विचारले की निवडणूक आयोगाने तुम्हाला नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे आणि तुम्ही उत्तर देत नाही आहात. यावर बोलताना गांधी म्हणाले, ज्यावर मला सही करण्यास सांगण्यात येत आहे तो डेटा हा निवडणूक आयोगाचा आहे, तो माझा डेटा नाही. आम्ही तो तुम्हाला दिला आहे, तुम्ही तो तुमच्या वेबसाइटवर टाका, सर्वांना कळेल. हे फक्त बंगळुरूमध्येच घडले नाही, तर देशातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये घडले आहे. निवडणूक आयोगाला माहित आहे की त्यांचा डेटा फुटेल, म्हणून तो नियंत्रित करण्याचे आणि लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत', असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली
कर्नाटकच्या मतदार यादीतील अनियमिततेच्या राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली. आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून मतदारांची नावे, पत्ते आणि ओळखींमध्ये अनियमिततेच्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास आणि प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असंही म्हटले आहे.
विरोधी पक्षाच्या खासदारांचा मोर्चा
आज इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. यावेळी संसद मार्गावरील पीटीआय इमारतीजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता अडवला. यानंतर अनेक खासदार रस्त्यावर बसून घोषणाबाजी करत होते. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, काँग्रेसच्या ( Congress ) संजना जाटव आणि जोतिमणी यांच्यासह काही महिला खासदार बॅरिकेड्सवर चढून निवडणूक आयोगाविरुद्ध घोषणाबाजी सुरू होत्या.