नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राहुला गांधी यांनी उचललेल्या या पावलानंतर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला असून, राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभावनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतरही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ये प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीला अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जयराम रमेश, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील, रणदीप सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:47 IST