राजौरी/जम्मू :ऑपरेशन सिंदूरच्या कालावधीत नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या गोळीबारात आई-वडिलांपैकी एक किंवा दोन्ही गमावलेल्या २२ बालकांच्या शिक्षणाचा खर्च लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उचलणार आहेत. पक्षाच्या एका नेत्याने ही माहिती दिली.
राहुल गांधी यांनी पूंछचा दौरा केला होता व झळ पोहोचलेल्या कुटुंबांची भेट घेतली होती. ज्या कुटुंबातील आई-वडील, विशेषत: कमावणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाला, त्या शाळकरी विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यास त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आम्ही ही यादी राहुल गांधी यांच्याकडे जमा केली. पक्षाकडे फक्त पूंछ जिल्ह्यातील २२ बालकांची अशी यादी आहे. माझ्या तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटी अशा आणखी काही बालकांची नावे यादीत समाविष्ट केली जाऊ शकतात.
बालकांचे शिक्षण थांबू नये म्हणून मदत पोहोचलीही
पाकने केलेल्या गोळीबारात व ड्रोन हल्ल्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील २८ जणांचे प्राण गेले होते. पहलगाम अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी पाठवलेली वित्तीय मदत सुपूर्द करण्यासाठी पूंछ दौऱ्यावर आहे. बालकांचे शिक्षण प्रभावित होऊ नये, यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.