Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:22 IST2025-12-12T13:16:57+5:302025-12-12T13:22:07+5:30
Rahul Gandhi On Air Pollution: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले.

Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सभागृहात देशातील वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. त्यांनी हा मुद्दा कोणताही आरोप-प्रत्यारोप न करता एका राष्ट्रीय आव्हानाच्या स्वरूपात मांडला आणि यावर मात करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी म्हणाले की, "देशातील अनेक ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे लाखो मुले फुफ्फुसांच्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. तसेच, अनेक नागरिक कर्करोगाने त्रस्त आहेत आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर सरकार आणि आपल्या सर्वांमध्ये पूर्ण एकमत होईल, असा माझा विश्वास आहे. आपण सर्वजण वायू प्रदूषण आणि त्यामुळे आपल्या लोकांना होणारे नुकसान हाताळण्यासाठी सहकार्य करू इच्छितो, यावर सभागृहातील प्रत्येकजण सहमत असेल."
सभागृहात आराखडा सादर करण्याची मागणी
या गंभीर आव्हानाचा सामना करण्यासाठी, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला वायू प्रदूषणाच्या समस्येवर पुढील चार ते पाच वर्षांचा ठोस आराखडा सभागृहात सादर करण्याची मागणी केली. यातून या राष्ट्रीय संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याने काम करण्याची त्यांची इच्छा स्पष्ट झाली.