राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:48 IST2025-09-18T12:47:40+5:302025-09-18T12:48:02+5:30
Rahul Gandhi on Vote Chori: केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला आहे. ज्या लोकांची नावे वगळण्यात आली त्या लोकांनाच त्यांनी स्टेजवर आणून कशाप्रकारे हे केले जात आहे, याचा भांडाफोड केला आहे. कर्नाटकातील एका मतदाराने सीबीआय चौकशी लावली, ती निवडणूक आयोगाकडून कशी थांबविली गेली, याबाबत या पत्रकार परिषदेत सांगितले गेले आहे. अशातच राहुल यांनी आता आपल्याला निवडणूक आयोगातून मदत मिळू लागल्याचा दावा केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. कर्नाटकच्या आळंद येथे ६०८० मते वगळण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार शोधून काढले, असे राहुल म्हणाले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप राहुल यांनी केला.
मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारीने माहिती शेअर करत आहे. आम्ही पुराव्यासह या गोष्टी मांडत आहोत. १००० टक्के आम्ही सर्व पडताळणी करून या गोष्टी समोर आणत आहोत. भारताची लोकशाही वाचवणं हे आमचे कर्तव्य आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. कर्नाटक सीआयडीने यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर एकदाही उत्तर पाठवले नाही. ज्या ज्या बूथवर काँग्रेस मजबूत आहे. तिथे मतदारांची नावे वगळण्यात येत होती, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, त्यांना आता निवडणूक आयोगातून मदत मिळत आहे. आयोगातून माहिती मिळू लागली आहे. प्रत्येक राज्यात मतांची चोरी होत आहे. गेल्या १० वर्षांपासून हे सुरू आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळण्यात आली आहेत. दलित आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप राहुल यांनी केला.