Rahul Gandhi on S. Jainshankar : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर तीव्र कारवाई केली. यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे. पण, आता याच ऑपरेशनवरुन राजकारण सुरू झाले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी पाकिस्तानला हल्ल्याची माहिती असल्याचे म्हटले. आता यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणत आहेत की, कारवाईच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती की, भारत फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे, पाकिस्तानी सैन्याला नाही.
या व्हिडिओवरुन राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन निषेधार्ह आहे. मी पुन्हा विचारेन की, पाकिस्तानला हल्ल्याची माहित असल्याने आपण किती भारतीय विमाने गमावली? ही चूक नव्हती, हा गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या हे मान्य केले आहे. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे गुन्हा आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.
सिंदूरचा सौदा होत राहिला, पंतप्रधान मोदी गप्प बसलेकाँग्रेस नेते पवन खेरा म्हणतात की, परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, आम्ही ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिली होती. डोनाल्ड ट्रम्पने व्यापाराची धमकी देऊन युद्ध थांबवले. ही खूप गंभीर बाब आहे. सिंदूरचा व्यवहार सुरूच होता अन् पंतप्रधान मोदी गप्प होते. तुम्ही अमेरिका आणि चीनबाबत काहीही बोलत नाही. तुमच्याबद्दल त्यांच्याकडे काय गुपिते आहेत? परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला माहिती का दिली? याला कूटनीति म्हणतात का? हे हेरगिरी आहे, हा देशद्रोह आहे, हा गुन्हा आहे. या माहितीमुळेच मसूद अझहर आणि हाफिज सईद पळून गेले का? तुम्ही त्यांना का वाचवले? मसूद अझहर दुसऱ्यांदा वाचला, अशी टीका त्यांनी केली.