Rahul Gandhi on Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण काळात सर्व विरोधक सरकारच्या बाजूने आले आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत
केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले की, हा फक्त हल्ला नसून, एक निर्दयी नरसंहार आहे. हा भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये, तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलावे, असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणतात, मी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना भेटलो. ते म्हणाले की, आमची मुले शहीद झाली, पण आम्हाला फक्त हौतात्म्याचे नाटक दाखवले जात आहे. त्यांचे हे शब्द खूप गंभीर आहेत. यावरुन असे दिसून येते की, लोकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होत आहे. इतके लोक मारले गेले, हे कदापी मान्य नाही. ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना योग्य शिक्षा देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांना कुठलाही उशीर न करता थेट कारवाई करावी.