Rahul Gandhi on Election Commission: मागील काही काळापासून विरोधक सातत्याने निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम केल्याचा आरोप करत आहेत. बिहारमधील मतदार यादीवरुन तर बराच गदारोळ सुरू आहे. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.1) निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला. 'मतं चोरीला जात आहेत. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. मी गांभीर्याने बोलतोय, निवडणूक आयोगच या मतचोरीत सहभागी आहे. आयोग हे भाजपसाठी करत आहे,' असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
संसद भवन परिसरात मीडियाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'आम्हाला मध्य प्रदेशात शंका होती. लोकसभा निवडणुकीतही शंका होती. महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान आमची शंका आणखी वाढली. आम्हाला संशय होता की, राज्य पातळीवर एक कोटी मतदार जोडले गेले आहेत. आम्ही तपशीलात गेलो, मात्र निवडणूक आयोगाने मदत केली नाही. आम्ही स्वतःहून चौकशी केली. त्याला सहा महिने लागले. पण आम्हाला जे सापडले आहे, ते अणुबॉम्बसारखे आहे. हे जर फुटले, तर तुम्हाला भारतात कुठेही निवडणूक आयोग दिसणार नाही.'
'मते चोरीला जात आहेत. आमच्याकडे आता याचे ठोस पुरावे आहेत. निवडणूक आयोगही यात सहभागी आहे. मी हे अगदी गंभीरपणे सांगतोय, निवडणूक आयोगातील जो कोणी हे काम करत आहे. वरपासून खालपर्यंत...आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हा देशद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, निवृत्त व्हा, कुठेही जा...आम्ही तुम्हाला शोधून काढू,' असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
यापूर्वी केलेला गंभीर आरोपराहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते की, महाराष्ट्र निवडणुकीत आमची फसवणूक झाली. आम्ही निवडणूक आयोगाला मतदार यादी दाखवण्यास सांगितले, पण आम्हाला मतदार यादी दाखवण्यात आली नाही. आम्ही म्हटले होते की व्हिडिओग्राफी दाखवावी, नंतर व्हिडिओग्राफीचा कायदाच बदलण्यात आला. महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. आम्ही कर्नाटकात नुकतेच संशोधन केले, तिथे एक मोठी चोरी पकडली आहे.
चोरी कशी आणि कुठे केली जाते, हे आम्ही लवकरच सर्वांसमोर घेऊन येऊ. आता त्यांना कळले आहे की, आम्हाला त्यांचा खेळ समजला आहे. आम्ही एक मतदारसंघ निवडला आणि तिथे सखोल संशोधन केले. आम्ही त्यांची संपूर्ण व्यवस्था शोधून काढली, ते चोरी कशी करतात, कोण मतदान करते, ते कसे मतदान करतात, नवीन मतदार कसे तयार होतात. आता त्यांना समजले आहे, त्यामुळेच त्यांनी बिहारची संपूर्ण व्यवस्था नवीन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मतदार हटवतील आणि मतदार याद्या नवीन पद्धतीने बनवतील. भारतात निवडणुका चोरीला जात आहेत, हे वास्तव आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.