मुंबई: काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आज प्रथमच प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये रोड शो केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका गांधी, तर पश्चिम भागाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियंका आणि राहुल यांच्या शोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या रोड शोनंतर राहुल यांनी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मात्र यावेळी राहुल गांधींना इतिहासाचा काहीसा विसर पडला. काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधींनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. त्यामुळे राज्यात पक्ष बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मात्र काँग्रेसची स्थापना उत्तर प्रदेशात नव्हे, तर मुंबईत झालेली आहे. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. तेव्हा मुंबई बॉम्बे नावानं ओळखली जायची. गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी 72 प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या संकेतस्थळावर ही माहिती छायाचित्रासह उपलब्ध आहे.
...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:46 IST