'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:11 IST2025-02-03T15:11:02+5:302025-02-03T15:11:39+5:30
'आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे.'

'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र
Rahul Gandhi in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज(3 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील 'मेक इन इंडिया' आणि एकंदरीत उत्पादन क्षेत्रावर निशाणा साधला. देशातील उत्पादन 60 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर असल्याची टीका राहुल यांनी केली.
'मेक इन इंडिया' चांगली कल्पना
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत नवीन काहीच नाही. यात बेरोजगारीचा उल्लेख नाही. यूपीए किंवा एनडीएने तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले नाही. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत.'
LIVE: LoP Lok Sabha Shri @RahulGandhi's reply to the motion of thanks on the President's address. https://t.co/m7W0E2x8oc
— Congress (@INCIndia) February 3, 2025
उत्पादन सर्वात खालच्या पातळीवर
मेक इन इंडियाचा उल्लेख करत राहुल गांधींनी फोन दाखवला अन् म्हणाले की, 'हा फोन भारतात बनवला, असे आपण म्हणत असलो तरी, त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत आणि इथे फक्त असेंबल केले आहेत. जग पूर्णपणे बदलत आहे. आपण पेट्रोलियमपासून बॅटरी आणि अणुऊर्जेकडे वाटचाल करत आहोत. सर्व काही बदलत आहे. मागच्या वेळी क्रांती झाली, तेव्हा भारत सरकारने संगणक क्रांती पाहिली होती आणि त्यावर लक्ष केंद्रित केले होते. आज त्याचा परिणाम दिसून येत आहे. संगणक आला की लोक हसायचे. मी वाजपेयीजींचा आदर करतो, पण तेही विरोधात बोलले होते. आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
रिलायन्स, अदानी, टाटा वाढले पण वेगाने नाही
युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. राहुल यांनी रोबोट्सपासून ड्रोनपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की, 'आज लोक एआयबद्दल बोलत आहेत. एआय डेटावर कार्य करते. डेटाशिवाय काहीही नाही. प्रश्न असा आहे की एआय कोणता डेटा वापरत आहे? भारताकडे कोणतीही आकडेवारी नाही. एकतर AI चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल. मी या देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशात क्रांती येणार आहे. आपण पेट्रोलवरुन इलेक्ट्रिक मोटरवर स्विच करत आहोत. युद्ध, वैद्यकीय उपचार, शिक्षण, सर्वकाही बदलत आहे. कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. 1990 पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगले काम केले आहे. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला, पण एकूणच देशाचा विकास झाला नाही.'