Rahul Gandhi in Loksabha: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (10 मार्च) सुरू झाला आहे. 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 16 बैठका होणार आहेत. या कालावधीत वक्फ कायद्यासह सुमारे 36 विधेयके मांडण्याची तयारी सरकार करत आहे. दरम्यान, आज लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीचा मुद्दा उपस्थित केला.
मतदार यादीवर सभागृहात चर्चा आवश्यक विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण देशात आणि प्रत्येक विरोधी राज्यात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील मतदार यादीत गडबड असल्याचा संशय व्यक्त होतोय. या मतदार यादीवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभा व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी मतदार यादीबाबत X वर एक पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, संपूर्ण विरोधी पक्ष संसदेत मतदार यादीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील अनियमिततेबाबत माझी पत्रकार परिषद होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला, मात्र पारदर्शकतेबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आता मतदार यादीतील दुबार नावांचे नवे पुरावे समोर आले असून, त्यामुळे नवे आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, असेही राहुल म्हणाले.
कपिल सिब्बल काय म्हणाले?मतदार यादीवर बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले, निवडणूक आयोग सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. लोकशाही अशीच चालू राहिली आणि निवडणूक आयोग सरकारची वकिली करत राहिला, तर निश्चितच निकाल तुमच्यासमोर आहेत.
बंगालमध्ये बनावट मतदार सुरू आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, निवडणूक आयोग आणि भाजप मिळून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतात. बनावट मतदार तयार करत आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत केले आणि आता बंगालमध्ये सुरू झाले आहे. निवडणूक प्रक्रियाच निष्पक्ष नसेल, तर काय करायचे. या संपूर्ण निवडणूक घोटाळ्यात सरकार आणि निवडणूक आयोगाची बाजू पुढे यायला हवी.