काँग्रेसमध्ये राहुल गांधी तर भाजपात मोदी ‘हिट’!

By Admin | Updated: May 12, 2014 04:38 IST2014-05-12T04:38:48+5:302014-05-12T04:38:48+5:30

लोकसभेच्या निवडणुकीत जसजसे रंग भरत गेले तसतसे लोकशाहीतील कुरूक्षेत्रावरील चित्रही पालटत गेले. लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर झुंजणार्‍या बलाढय पक्षांपेक्षाही त्यांचे सेनापती अधिक प्रकाशझोतात आले.

Rahul Gandhi in Congress and BJP hits 'hit' | काँग्रेसमध्ये राहुल गांधी तर भाजपात मोदी ‘हिट’!

काँग्रेसमध्ये राहुल गांधी तर भाजपात मोदी ‘हिट’!

लोकसभेच्या निवडणुकीत जसजसे रंग भरत गेले तसतसे लोकशाहीतील कुरूक्षेत्रावरील चित्रही पालटत गेले. लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर झुंजणार्‍या बलाढय पक्षांपेक्षाही त्यांचे सेनापती अधिक प्रकाशझोतात आले. त्यांचे दौरे, त्यांची भाषणे, त्यांच्या मुलाखती आणि यंदा विलक्षण गाजलेले त्यांचे रोड शो... सारे काही चर्चेत राहिले. पण या सार्‍याचा केंद्रबिंदू मात्र काँग्रेससाठी राहुल अन् भाजपासाठी मोदी हेच राहिले. राहुल गांधींवर फोकस नवी दिल्ली : निवडणुकांचा शेवटचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. सुरुवातीपासून ते अगदी वाराणशीतील अखेरच्या ‘रोड शो’पर्यंत काँग्रेसच्या प्रचाराचे शिवधनुष्य उचलले ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील प्रचारात मोलाची भूमिका पार पाडली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी अगदी मोजक्याच सभा केल्या. परंतु पक्षाचे पोस्टर असो किंवा जाहिरात सगळीकडे राहुल गांधीच झळकले. तर प्रियंका गांधी-वड्रा यांनी केवळ अमेठी व रायबरेली येथे प्रचार केला. परंतु त्यांनी देशस्तरावर आपली छाप सोडली. सुरुवातीच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी संपुआ सरकारने केलेल्या कामांच्या आधारावर प्रचाराला जोर दिला. परंतु नंतर मात्र भाजपा व नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वैयक्तिक हल्ल्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसने राहुल गांधी यांना अद्यापही पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केलेले नाही. परंतु काँग्रेसची सत्ता आली तर तेच पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. राहुल यांनी देशात १०० हून अधिक सभा तर ७ ‘रोड शो’ केले. नरेंद्र मोदी केंद्रस्थानी! नवी दिल्ली : ‘मिशन २७२ प्लस’अंतर्गत निवडणुकांच्या मैदानात उतरलेल्या भाजपाच्या प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोदी यांच्याभोवतीच प्रचार फिरला. पक्षाच्या इतर नेत्यांनीदेखील प्रचार केला. परंतु त्यांचा प्रचार झाकोळल्या गेला. विशेष म्हणजे भाजपाच्या प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील सहकार्य केले. आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकानंतर संघाने प्रथमच निवडणुकांत सक्रिय भूमिका पार पाडली. पक्षाने सुरुवातीला सुशासन व विकासाच्या मुद्यावर भर दिला होता. परंतु नंतर विकास बाजूला पडत गेला व वैयक्तिक टीकेचाच सूर दिसून आला. लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मोठ्या सभा झाल्याच नाहीत. मात्र मोदी यांच्याभोवतीच प्रचार फिरत राहिल्याने विरोधी पक्ष एकजूट झाले. सोनिया गांधी : या मागील निवडणुकांच्या तुलनेत कमी सक्रिय दिसल्या. सुरुवातीला फारशा सक्रिय नसलेल्या सोनिया गांधी यांनी नंतर अनेक सभा केल्या व त्यांनीदेखील भाजपाच्या आरोपांना परतावून लावत टीकेचा भडिमार केला. डॉ. मनमोहन सिंग : यांनी घोषणा केली होती की, ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत; तरीदेखील ते प्रचारात समोर राहतील, असा अंदाज होता. परंतु त्यांनी मोजक्याच सभा घेतल्या. त्यांनी स्वत: हा निर्णय घेतला की, सत्ताविरोधी लाटेच्या प्रभावामुळे पक्षाने त्यांना असे सांगितले याचे कारण स्पष्ट झाले नाही. प्रियंका गांधी-वड्रा : यांनी देशभरात प्रचार करावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु प्रियंका यांनी सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेली व राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठी येथेच प्रचार मर्यादित ठेवला. आक्रमक प्रचारामुळे देशस्तरावर त्यांची छाप पडली. तसेच मोदींवर जोरदार प्रहार केला व त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. मोदींनी केल्या ४३७ सभा प्रचार मोहिमेत मोदी यांनी लहान-मोठ्या मिळून ४३७ सभांना संबोधित केले. गेल्या १ सप्टेंबरपासून त्यांनी देशभरात जवळपास सहा हजार सभा व कार्यक्रम घेतले. मोदी यांनी २६ मार्च रोजी जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे सभा करून प्रचार मोहिमेचा शंखनाद केला. त्यानंतर ४६ दिवसांत त्यांनी जम्मू ते कन्याकुमारी व अमरेली ते अरुणाचल प्रदेशापर्यंत १९६ भारत विजय सभांना संबोधित केले. ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत पक्षाने चार हजार कार्यक्रमांचे आयोजन केले. मोदी यांनी ४३७ प्रचार सभांना संबोधित केले. शिवाय ३-डी भाषण, रोड शो आणि इतर कार्यक्रम मिळून मोदी ५८३७ सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी झाले. ‘हायटेक’ प्रचारावर जोर भाजपाच्या प्रचारात ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ‘चाय पे चर्चा’ यासारख्या कार्यक्रमापासून ते ३-डी तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेण्यात आली. प्रचारादरम्यान निवडणुकीच्या गाण्यांसाठी ख्यातनाम गायकांसोबत मोदी यांचा आवाज वापरण्यात आला.

Web Title: Rahul Gandhi in Congress and BJP hits 'hit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.