शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:31 IST2025-12-13T17:30:49+5:302025-12-13T17:31:50+5:30
Rahul Gandhi & Gautam Adani News: शरद पवार यांच्या वाढदिवानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये खास मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या पार्टीची आता राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे या पार्टीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकाच हॉलमध्ये आमने-सामने आले होते.

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस शुक्रवारी थाटामाटात साजरा झाला. शरद पवार यांच्या वाढदिवानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये खास मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या पार्टीची आता राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे या पार्टीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकाच हॉलमध्ये आमने-सामने आले होते. मात्र या घटनेचं एकही छायाचित्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र राहुल गांधी आणि गौतम अदानी समोरा समोर आल्यानंतर नेमकं काय घडलं याबाबत सध्या खमंग चर्चा सुरू आहेत.
शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत एका मेजवानीचं आयोजन केलं होतं. या मेजवानीला सत्ताधारी आमि विरोधी पक्षांमधील नेत्यांसह केंद्री मंत्री, खासदार आणि काही प्रसिद्ध उद्योगपतीही उपस्थित होते. उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांचाही समावेश होता. तर शरद पवार यांचे मित्र असलेले उद्योगपती गौतम अदानी हेही या पार्टीला उपस्थित होते.
राहुल गांधी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने बोचरी टीका करत असतात, त्यामुळे राहुल गांधी आणि गौतम अदानी आमने सामने आल्यानंतर नेमकं काय झालं याबाबत जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये नेमकं काय घडलं, याबाबतचं वृत्त आज तक या हिंदी संकेतस्थळानं दिलं आहे.
या वृत्तानुसार ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी याबाबत सांगितले की, राहुल गांधी आणि गौतम अदानी हे पहिल्यांदाच एकाच हॉलमध्ये आमने-सामने आले ही या पार्टीमधील उल्लेखनीय बाब ठरली. राहुल गांधी आणि गौतम अदानी हे आमने सामने आल्याचे दिसून आले. मात्र या क्षणाचं कुणीही छायाचित्र काढलं नाही.
तर ज्येष्ठ पत्रकार आदेश रावल यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये औपचारिक हस्तांदोलन, अभिवादन वगैरे झालं का? याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नााही. मात्र दोघेही आमने सामने आले. तसेच त्यांच्यात हस्तांदोलन झालं असावं, असा माझा अंदाज आहे. मात्र काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांनी आजूबाजूच्या लोकांनी छायाचित्र काढू नये यासाठी प्रसंगावधान राखून परिस्थितीचा अंदाज घेत हस्तक्षेप केला, असेही रावल यांनी सांगितलं.
एवढंच नाही तर लोकसभेमध्ये काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर सातत्याने बोचरी टीका करणारे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे हेसुद्धा या पार्टीला उपस्थित होते. तसेच निशिकांत दुबे आणि राहुल गांधी यांची पार्टीदरम्यान भेटही झाली. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या पार्टीला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, जयंत पांडा, जयंत चौधरी, नीरज शेखर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेसुद्धा उपस्थित होते.