Rafale Deal: नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाकाः राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:04 PM2019-02-12T12:04:14+5:302019-02-12T12:37:54+5:30

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला.

Rafale Deal: Narendra Modi's corrupt, cast them into prison: Rahul Gandhi's attack | Rafale Deal: नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाकाः राहुल गांधींचा हल्लाबोल

Rafale Deal: नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाकाः राहुल गांधींचा हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देराफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे राफेल कराराबाबत भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र मंत्री यापैकी कुणालाही माहिती नव्हती

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. 

राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित करून राफेल काराराबाबत नवा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.  आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, राफेल करारप्रकरणी एक ईमेल समोर आला आहे. एअरबस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह यांच्याशी संबंधित असलेल्या या ईमेलमध्ये फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अनिल अंबानी गेले होते, असा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आल्यानंतर एक करार होईल, यात अनिल अंबानी यांचे नाव असेल, असे अनिल अंबानी यांनी या बैठकीत सांगितले होते.'' 




''या राफेल कराराबाबत भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र मंत्री यापैकी कुणालाही माहिती नव्हती. मात्र अनिल अंबानी यांना दहा दिवस आधीच यासंदर्भातील माहिती होती. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींसाठी मध्यस्थाचे काम करत होते, असा होतो. या आधारावर गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खटला दाखल केला गेला पाहिजे. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. कारण हा देशद्रोहाचा मामला आहे.'असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 



 

''राफेल करारामध्ये भ्रष्टाचार, प्रक्रिया आणि देशद्रोह या तीन बाबतीत गुन्हा घडला आहे. त्यातून कुणीही सुटणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच तसेच कॅगच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  कॅगच अहवाल हा निरर्थक आहे. म्हणजे चौकीदार ऑडिटर जनरल रिपोर्ट आहे. तो नरेंद्र मोदींचा अहवाल आहे. थोडक्यात सांगायचं तर चौकीदाराने, चौकीदाराच्यावतीने, चौकीदारासाठी तयार केलेला अहवाल म्हणजे कॅगचा अहवाल होय,''अशी टीका राहुल गांदी यांनी केली.  



 

Web Title: Rafale Deal: Narendra Modi's corrupt, cast them into prison: Rahul Gandhi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.